रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत. एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम खरेदी कराराच्या दृष्टीने पुतिन यांचा हा भारत दौरा महत्वाचा आहे. आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणार आहे. या खरेदी करारावर गुरुवारी पंतप्रधान मोदी आणि पुतिन स्वाक्षरी करतील.

या कराराशिवाय मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये सुरक्षेच्या आघाडीवरील वेगवेगळी आव्हने, पाकिस्तानकडून असलेला दहशतवादाचा धोका या मुद्यावरही चर्चा होईल. भारत आणि रशियामध्ये अवकाश सहकार्य करारही होण्याची शक्यता आहे.

भारताने रशियाबरोबर एस-४०० क्षेपणास्त्राचा खरेदी करार केला तर अमेरिकेकडून निर्बंध घातले जाण्याचीही शक्यता आहे. रशिया बरोबर शस्त्रास्त्र करार केला तर निर्बंध घालण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले आहेत. कारण चीनने रशियाकडून एसयू-३५ फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत इराण, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांवर निर्बंध घातले आहेत.

अलीकडेच झालेल्या टू प्लस टू बैठकीत एस-४०० च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात आले. पण अमेरिकेने अद्याप कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.