विविध देशांकडून वाजपेयींच्या कार्याचा गौरव

वॉशिंग्टन, मॉस्को : अमेरिका आणि रशियासह अनेक देशांच्या नेत्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रादेशिक शांतता व द्विपक्षीय संबंध यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारे संदेश पाठवले आहेत. पुतिन यांनी वाजपेयी यांचे वर्णन असामान्य मुत्सद्दी नेता असे केले असून, दोन देशांतील धोरणात्मक भागीदारी व द्विपक्षीय संबंधात त्यांनी मोठे योगदान दिले होते, त्यांना जगात नेहमीच आदर मिळाला याचे कारण ते असामान्य नेते होते.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले, की वाजपेयी यांनी अमेरिका व भारत यांच्यातील संबंधांचे महत्त्व ओळखले होते. त्यातच त्यांनी जगाची आर्थिक भरभराट व सुरक्षा यातही मोठी कामगिरी केली होती. दोन लोकशाही देशांना त्यांच्या दूरदृष्टीचा मोठा फायदा झाला. अमेरिकेच्या वतीने आम्ही वाजपेयी यांच्या निधनाबाबत तीव्र दु:ख व्यक्त करीत आहोत. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच आजही दोन्ही देशांना द्विपक्षीय संबंधात फायदा होत आहे. अमेरिकी लोक वाजपेयी यांच्या निधनाने झालेल्या दु:खात भारतीय लोकांच्या पाठीशी आहेत.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे, की अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबाबत देशाच्या वतीने तीव्र दु:ख व्यक्त करीत आहे. वाजपेयी हे दूरदृष्टीचे नेते होते व नि:स्वार्थी देशसेवेसाठी ते लोकांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, नेपाळचा खरा मित्र व सदिच्छुक आम्ही गमावला आहे. नेपाळ व भारत यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

श्रीलंकेचे अध्यक्ष मथिरपाला सिरिसेने व पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे यांनीही वाजपेयींच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करताना त्यांनी श्रीलंकेच्या स्थिरतेत मोलाची भूमिका पार पाडल्याचे म्हटले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी वाजपेयी यांच्या निधनाने धक्का बसल्याचे सांगताना ते बांगलादेशचे मित्र होते व आमच्या देशात त्यांच्याविषयी आदराची भावना होती असे म्हटले आहे.

पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान नियाझी व पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे प्रमुख शाहबाज शरीफ यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सांगितले, की दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधात मोठे बदल घङवले. वाजपेयी हे मुत्सद्दी नेते होते व त्यांनी भारत- पाकिस्तान संबंधात सुधारणा घडवतानाच सार्कचे ते समर्थक राहिले असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.

मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे, की माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या निधनाने आम्हाला तीव्र दु:ख वाटले. त्यांनी केलेली सेवा व देशाला दिलेले नेतृत्व यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. त्यांनी साहित्य व कलेतही मोठे योगदान दिले होते. भारताची त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली असून, आम्ही या दु:खाच्या प्रसंगी भारतातील लोकांच्या पाठीशी आहोत. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जुगनाथ यांनी म्हटले आहे, की वाजपेयी यांनी भारताच्या भवितव्याला आकार दिला. सामान्य लोकांशी त्यांना सहवेदना होती. शिवाय त्यांनी खंबीर नेतृत्व दिले.

मॉरिशसमध्ये भारत व मॉरिशस या दोन्ही देशांचे ध्वज अर्ध्या वर उतरवले जातील. इस्रायलचे परराष्ट्र कामकाज संचालक युवल रोटेम यांनी वाजपेयी यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करताना माजी पंतप्रधान एरिअल श्ॉरॉन हे वाजपेयींशी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र ट्विट केले आहे. भूतानचे माजी पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनीही शोकसंदेश ट्विट केला असून, जगासाठी वाजपेयी हे आदर्श राजकीय नेत्याचे उदाहरण होते असे म्हटले आहे.