रशियाच्या सोयूझ यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे सोडलेले मालवाहू अवकाशयान कोसळले असतानाच आता रशियाच्या अग्निबाणाने सोडलेला मेक्सिकोचा उपग्रह नादुरुस्त होऊन सायबेरियात कोसळला.
रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीने म्हटले आहे, की उपग्रहात बिघाड झाला होता. नेमके काय झाले हे अजून समजलेले नसून त्याचा तपास सुरू आहे. अग्निबाणाचा तिसरा टप्पा अजून सापडलेला नाही. तो सायबेरियात कोसळला असावा. रशियाचा प्रोटॉन एम अग्निबाण रशियाच्या बैकोनूर अवकाशतळावरून सकाळी ८.४८ वाजता शनिवारी झेपावला, पण त्याला अपयशाची परंपरा असल्याने तो कोसळला. उपग्रह अग्निबाणापासून वेगळा होण्याच्या अवस्थेत कोसळला. अग्निबाणाच्या तिसऱ्या टप्प्यात एक स्वीच बंद पडल्याने हा अग्निबाण उपग्रहासह कोसळला. आतापर्यंत या अग्निबाणाने तीन दिशादर्शन उपग्रह कोसळले आहेत. निरीक्षकांच्या मते रशियाच्या अवकाश कार्यक्रमात ब्रेन ड्रेन म्हणजे बुद्धिमान लोकांची कमतरता असून अभियांत्रिकी व इतर मानके घसरली आहेत.
 रशियाच्या रॉसकॉसमॉस या अवकाश संस्थेने म्हटले आहे की, मेक्सिकन उपग्रहला घेऊन जात असताना अग्निबाण कोसळला.
प्रोटॉन एम अग्निबाणाच्या मदतीने मेक्ससॅट १ हा उपग्रह सोडला जात असताना ही घटना घडली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना या घटनेची माहिती दिली आहे. त्यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. २८ एप्रिलला प्रोग्रेस हे अवकाशयान रशियाच्या सोयूझ यानाने सोडले जात असताना कोसळले होते. दरम्यान ब्रिटीश गायिका सारा ब्राइटमन हिने सांगितले की, आपण अवकाश पर्यटक म्हणून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणार होतो पण व्यक्तीगत कारणास्तव आता जाणार नाही, सुरक्षेच्या कारणास्तव ती जाणार नसल्याचा अंदाज रशियाच्या प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला आहे. रशियाला पाश्चिमात्य व आशियायी व्यावसायिक उपग्रह सोडण्याच्या उद्योगात परकीय चलन मिळत होते पण आता या देशांचा रशियावरील विश्वास उडाल्यासारखाच आहे.