अमेरिकेत हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली रशियन महिला मारिया बुटीनाला अमेरिकन न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकिलाने बुटीना अमेरिकन नागरिकांबरोबर संबंध विकसित करण्याबरोबर तिथल्या राजकीय गटांमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत होती असे सांगितले. अमेरिकेतील रिपब्लिकन राजकारण्यांवर प्रभाव टाकण्यासाठी तिचे जोरदार प्रयत्न सुरु होते असे सरकारी वकिलाने अमेरिकन कोर्टात सांगितले.

अमेरिकेत वावरताना ती रशियन गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होती असा दावा तपासकर्त्यांनी केला आहे. २०१६ साली अमेरिकन विद्यापीठातून पदवी शिक्षण घेण्यासाठी तिने स्टुडंट व्हिसासाठी अर्ज केला होता. वर्क व्हिसा मिळवण्याचाही तिचा प्रयत्न होता. जेणेकरुन अमेरिकेत जास्त काळ राहता येईल. तिने नोकरीसाठी एका अमेरिकन नागरिकाबरोबर सेक्स करण्याचीही तयारी दाखवली होती.

बुटीना तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या एका रिपब्लिकन राजकारण्याबरोबर फिरायची. तो आपला प्रियकर असल्याचेही ती सर्वांना सांगायची आहे. पण खासगीमध्ये बुटीना त्याचा खूप तिरस्कार करायची अशी माहिती सरकारी वकिलाने कोर्टाला दिली. रशियाच्या फायद्याच्या गोष्टी अमेरिकन राज्यकर्त्यांकडून करुन घेण्याचा बुटीनाचा उद्देश होता असे सरकारी वकिलाने अमेरिकन कोर्टात सांगितले. तिचा कल प्रामुख्याने रिपब्लिकन राजकारण्यांकडे होता. बुटीनाचा वापर करुन अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेची खडानखडा माहिती ठेवण्याचा रशियाचा हेतू होता.

बुटीनावर कारस्थान रचल्याचा आणि रशियासाठी हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मारिया बुटीनाला रविवारी अटक करण्यात आली. तिच्यावर रशियन सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरुन काम करत असल्याचा आरोप करण्यात आला. अमेरिकेच्या कोषागार कार्यालयाने या रशियन बँकेवर निर्बंध आणले आहेत. बुटीनाच्या फेसबुक पेजवर तिचे अॅलेक्सझांडर टॉर्शिन बरोबर अनेक फोटो आहेत. तो रशियन सेंट्रल बँकेचा उपप्रमुख आहे. बुटीन त्याची सहाय्यक म्हणून काम करत होती.