‘ऑक्सफर्ड’च्या करोनाप्रतिबंधक लसीप्रमाणे रशियाच्या ‘स्फुटनिक-व्ही’ लसीचीही चाचणी भारतात घेतली जाण्याची शक्यता असल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य आणि करोनाविषयक उच्चाधिकार गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रशियाने ‘स्फुटनिक-व्ही’ लस यशस्वी झाल्याचा दावा केला असून भारतासह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलिपिन्स आणि ब्राझील या देशांनाही तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्याची विनंती केली आहे. या देशांमध्ये सप्टेंबर महिन्यातच चाचणी सुरू केली जाऊ शकते. या संदर्भात पॉल म्हणाले की, रशियाच्या सरकारने भारताशी दोन वेळा संपर्क साधला होता व भारतात ‘स्फुटनिक व्ही’ लसनिर्मिती करता येऊ शकेल का तसेच, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करता येईल का, यासंबंधी विचारणा केली होती. लसनिर्मिती तसेच चाचणीसंदर्भात भारत गांभीर्याने विचार करत असून त्याचा दोन्ही मित्र देशांना फायदा होऊ शकेल, असेही पॉल यांनी सांगितले.

करोनाचे रुग्ण ज्या गतीने वाढत आहेत, ते पाहता करोना रोखण्यासाठी नियमांचे पालन केले नाही तर, येत्या काळात करोना अत्यंत घातक ठरू शकेल, असा इशाराही व्ही.के.पॉल यांनी दिला. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर करोनाबाबत लोक बेफिकीर झाले असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते. लोक नियमांचे पालन करत नसल्याची तक्रार अनेक राज्यांनी केल्याचे पॉल यांनी सांगितले.

अनेक जण करोनाची लक्षणे दिसत असूनदेखील नमुना चाचणी करत नसल्याचीही उदाहरणे पाहायला मिळत आहेत. चाचणी करण्यास कोणालाही भीती वाटणार नाही असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. चाचणी करून घेण्यास लोक तयार नसतील तर ही बाब त्यांच्यासाठीच नव्हे तर, इतरांसाठीही धोकादायक ठरेल. आता तर मागणीनुसार चाचणी करून घेता येईल. त्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीचीही गरज उरलेली नाही, अशी माहिती पॉल यांनी दिली.

भारतातील लसीच्याही चाचण्या

भारत बायोटेक कंपनीच्या लसीची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी केली जात असून झायडस कॅडिला कंपनीच्या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्डच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत असल्याची माहिती पॉल यांनी दिली.