करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन असताना हिमाचल प्रदेशच्या शिमला जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रशियाच्या महिलेला आणि तिच्या भारतीय प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघे एका ट्रकमध्ये लपून प्रवास करत होते. याप्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

“उत्तर प्रदेशच्या नोएडा येथून हे दोघे कर्फ्यू पास नसताना एका ट्रकच्या मागे लपून प्रवास करत होते. बुधवारी(दि.६) शिमला जिल्ह्यात प्रवेश करताना शोघी येथे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतलेला तरुण कुल्लू येथील निर्मंड गावाचा रहिवासी आहे”, अशी माहिती शिमला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ओमापति जामवाल यांनी दिली.

आणखी वाचा- अडथळा नको म्हणून प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, सर्वांना सांगितलं करोनामुळे झाला मृत्यू

“निर्मंड येथे पोहोचल्यावर लग्न करण्याची दोघांची योजना होती. त्या दोघांसोबत ट्रक चालक आणि क्लीनरलाही ताब्यात घेण्यात आलं असून विविध आयपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेला धाली येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये तर तीन पुरूषांना शोघी येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली.