कर्नाटकमधील कारवार येथील एका कार्यक्रमामधील वागणुकीमुळे राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आर. व्ही देशपांडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हलियामध्ये काल स्थानिक खेळाडूंना क्रीडा साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात साहित्य वाटपादरम्यान देशपांडे यांनी मंचावरूनच थेट खेळाडूंच्या दिशेने स्पोर्ट्स किट्स फेकले. राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंत्र्याने दिलेल्या अशा वर्तवणूकीमुळे देशपांडेवर टिका होताना दिसत आहे.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी देशपांडे आपल्या मतदारसंघामध्ये आले होते. उद्घाटनानंतर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर देशपांडेच्या हस्ते खेळाडूंना क्रीडा साहित्य देऊन त्यांचा सत्कार सोहळ्याचेे आयोजन करण्यात आले होता. सत्कार करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी मोठी होती. मंचावरून आयोजकांपैकी एकजण खेळाडूंची नावे घेत त्यांना सत्कार म्हणून देण्यात येणारे क्रीडा साहित्य स्वीकारण्यासाठी मंचाच्या दिशेने येण्याच्या सूचना करत होता. अनेक खेळाडूंना गर्दीमधून मंचापर्यंत पोहचण्यास थोडा वेळ लागत होता. एकीकडे हे सर्व सुरु असतानाच पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या देशपांडे यांना पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची घाई होती. म्हणूनच त्यांनी सत्कार समारंभासाठी लागणार वेळ वाचवण्याच्या उद्देशाने खेळाडू मंचापर्यंत येऊन क्रीडा साहित्य स्वीकारण्याआधीच ते खेळाडूंकडे भिरकावण्यास सुरुवात केली. सर्व खेळाडूंना त्यांनी मंचावर न येता खालीच उभे राहण्यास सांगून त्यांच्या दिशेने साहित्य फेकत त्यांना ते पकडण्याची सूचना केली.

हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांना मंत्र्यांचे हे वागणे पटलेले नाही. मात्र या व्हिडीओबद्दल बोलताना देशपांडे यांनी हे प्रकरण इतके गंभीर नसल्याचे मत व्यक्त केले. ‘ती सर्व आमचीच स्थानिक पोरं आहेत. त्यांना मी कसा आहे हे ठाऊक आहे. काही लोकं उगचं राईचा पर्वत करण्यामागे लागले आहेत’ असं सांगतानाच देशपांडे यांनी त्यांच्यावर टिका करणाऱ्यांचाच समाचार घेतला आहे.