गेल्या तीन महिन्यांपासून प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या बस कंडक्टरला मंगळवारी जामीन मंजूर झाला. सीबीआयने ८ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात रायन इंटरनॅशनल शाळेत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर बस कंडक्टर अशोकला जामीन मिळाला आहे.

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न ठाकूर (वय ७ वर्ष) या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची सप्टेंबरमध्ये हत्या करण्यात आली. सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी बस कंडक्टर अशोकला अटक केली होती. अशोकनेच प्रद्युम्नची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. अशोकने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र प्रद्युम्नच्या कुटुंबीयांनी मागणीनंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याता आला आणि प्रकरणाला कलाटणी मिळाली.

काही दिवसांपू्र्वी सीबीआयने रायन इंटरनॅशनलमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलाला प्रद्युम्नच्या हत्ये प्रकरणी अटक केली. पालकसभा आणि परीक्षा टाळण्यासाठी त्याने प्रद्युम्नची हत्या केल्याचे समोर आले होते. या अटकेनंतर हरयाणा पोलिसांची नाचक्की झाली होती. बस कंडक्टर अशोकच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अशोकला जामीन मंजूर केला. सीबीआय आणि हरयाणा पोलिसांच्या तपासात तफावत असल्याचे अशोकच्या वकिलांनी सांगितले. अशोकविरोधात सीबीआयने कोणताही पुरावा सादर केला नाही. हा जीवन- मरणाचा प्रश्न आहे. म्हणून अशोकला जामीन मंजूर करत असल्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने सांगितले. अशोकला जामीन मिळाल्याने मी आनंदात आहे, अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी सांगितले. पोलिसांनी मुख्य आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण प्रद्युम्नच्या कुटुंबीयांचा लढा सुरुच राहणार, अशी प्रतिक्रिया ठाकूर कुटुंबीयांच्या वकिलांनी दिली.