गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युमन ठाकूरच्या हत्याप्रकरणात कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. मात्र माझा मुलगा निरपराध असल्याचा दावा आता या कंडक्टरच्या वडिलांनी केला आहे. माझ्या मुलाला हत्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, माझा मुलगा निष्पाप आहे. मात्र, पोलिसांनी त्याला विनाकारण या सगळ्या प्रकरणात गोवले आहे. पोलिसांनी आणि शाळा प्रशासनाने माझ्या मुलाला बळजबरीने हत्येचा गुन्हा कबूल करायला लावला आहे, असाही आरोप कंडक्टरच्या वडिलांनी केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोपीच्या वडिलांनी हा दावा केला आहे.

रेयान इंटरनॅशनल शाळा प्रशासनाने माझ्या मुलावर लावलेले आरोप चुकीचे आहेत. तसेच शाळा प्रशासनाकडून पालकांची दिशाभूल केली जाते आहे, हे म्हणताच कंडक्टरच्या वडिलांना रडू कोसळले. माझ्या भावाला या हत्या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले गेले असल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे.

आरोपीच्या वडिलांची आणि बहिणीची ही प्रतिक्रिया येत असतानाच तिकडे गुरुग्राममध्ये प्रद्युमन हत्या प्रकरणाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी दारूच्या एका दुकानाला आग लावून आपला निषेध व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणात सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे.

शुक्रवारी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान प्रद्युमन ठाकूरचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला होता. प्रद्युमनची गळा चिरून हत्या करण्यात आली होती आणि त्याच्या पोटातही वार करण्यात आले होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत कंडक्टरला अटक केली. ज्यानंतर त्याने हत्येची कबुलीही दिली. आता या प्रकरणी कंडक्टर निर्दोष असल्याचे त्याच्या वडिलांनी आणि बहिणीने म्हटले आहे.