गुरुग्राम येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात ७ वर्षांच्या प्रद्युमन ठाकूर या मुलाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला होता. या हत्या प्रकरणात बस कंडक्टरला अटक करण्यात आली. बस कंडक्टरनेच प्रद्युमन ठाकूरची हत्या केल्याची कबुलीही दिली. आपल्या लाडक्या मुलाला शाळेत सोडल्यावर हा सगळा प्रकार घडला यातून आम्ही अजून बाहेरही येऊ शकलो नाहीये. मात्र या सगळ्या हत्या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग देऊ नका अशी विनंती या मुलाच्या आई वडिलांनी केली आहे. आमच्या मुलाच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही प्रद्युमनच्या आई वडिलांनी केली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. आमच्या मुलाच्या हत्येप्रकरणी रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच माझ्या मुलाची हत्या कशी घडली त्याची संपूर्ण आणि सखोल माहिती मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रद्युमनच्या आई वडिलांनी केली आहे.

प्रद्युमनच्या हत्या प्रकरणात एका कंडक्टरला अटक झाली आहे, तो एकटाच दोषी आहे असे आम्हाला वाटत नाही. कारण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मुलाची हत्या करण्याआधी त्याचे लैंगिक शोषण करण्याचाही प्रयत्न झाला होता. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोण आहे? याचे उत्तर आम्हाला हवे आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे तसेच इतर कोणी दोषी आढळले तर त्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे असे हत्या झालेल्या मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे.

या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कंडक्टरला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या कंडक्टरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज सकाळीच रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आज रात्री उशिरा गुरुग्रामच्या नागरिकांनी प्रद्युमनच्या हत्येचा निषेध करत मेणबत्ती मोर्चाही काढला होता.