गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात स्कूलच्या मालकांना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयांनी मालकांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणी हरयाणा सरकारला नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

रेयान स्कूलमध्ये दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युमन ठाकूरची हत्या झाली होती. या प्रकरणात स्कूलचे मालक रेयान पिंटो, फ्रान्सिस पिंटो आणि ग्रेस पिंटो यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. त्यांच्या अटकेला स्थगिती दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात हरयाणा सरकारनेही उत्तर द्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. हे प्रकरण खूपच गंभीर आहे. सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय यावर कोणताही निर्णय देता येणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले.