काश्मीर प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरत यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. यावर मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांचे खंडन केले. तसेच अशा प्रकारची कोणतीही चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झाली नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. काश्मीर प्रश्नी कोणत्याही तिसऱ्या पक्षाशी चर्चा केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

द्विपक्षीय चर्चेतूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते. पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यापूर्वी त्यांना सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाचा खात्मा करावा लागेल, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. भारताच्या विरोधानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरचा मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच पाकिस्तान दहशतवादाविरोधात पावलं उचलत असून त्याचा फायदा दोन्ही देशांमध्ये चर्चा यशस्वी करण्यात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान आपण काश्मीर प्रश्नात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात मदत मागितली होती असा दावा केला होता. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला होता. तसेच काश्मीर प्रश्नी भारताने ट्रम्प यांची मदत मागितली नसल्याचे MEA ने म्हटले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळला यापूर्वी फेटाळला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मोदींनी आपली मदत मागितली होती, मध्यस्थी करण्याची विनंती केली होती त्यात काही तथ्य नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे कोणतीही मदत मागितली नसल्याचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला होता.