लंडन, वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची अमेरिकी समपदस्थ एस. जयशंकर यांच्याशी कोविड १९ परिस्थिती, हिंद प्रशांत क्षेत्र, बहुमंचीय सहकार्य या विषयांवर चर्चा झाली. जयशंकर हे सध्या चार दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत.

जी ७ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकी निमित्ताने  ते सोमवारी ब्रिटनमध्ये आले असून  कोविड १९ साथी विरोधात लढण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी ब्लिंकन यांचे आभार मानले. ब्लिंकन यांच्याशी चर्चेत रेमडेसिविर व प्राणवायूचा पुरवठा वाढवणे, लशीचे उत्पादन वाढवणे या मुद्दय़ांच्या अनुषंगाने त्यांनी काही मुद्दे मांडले. अमेरिकेने कठीण काळात प्राणवायू व रेमडेसिविर औषध पुरवठय़ात भारताला मदत केली याबाबत त्यांनी धन्यवाद दिले.

दरम्यान अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी कोविड १९ विरोधातील उपाययोजनांवर चर्चा केली असून भारताने मदतीसाठी अमेरिकेचे आभार मानले आहेत. जयशंकर यांनी अमेरिका व भारत यांच्या कोविड विरोधी जागतिक भागीदारीवर चर्चा केली. हिंद प्रशांत क्षेत्रात भारताची भूमिका महत्त्वाची राहील असे ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळात व जी ७ देशांत  सहकार्यावर त्यांनी भर दिला. अमेरिका व भारत यांच्यातील द्विक्षीय संबंध व्यापक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ब्लिंकन यांनी लंडन येथे वार्ताहरांना सांगितले की, कोविड मदतीबाबत तसेच इतर काही मुद्दय़ांवर आमच्यात चर्चा झाली. लस क्षमता वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. अमेरिकेत कोविड लाट जोरात असताना भारतानेही मदत केली होती याचा ब्लिंकन यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.