News Flash

प्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन, मधुर आवाज काळाच्या पडद्याआड!

एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती.  मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 1:26 pm

Web Title: s p balasubrahmanyam passed away ssj 93
Next Stories
1 नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार : राहुल गांधी
2 बिहार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; १० नोव्हेंबरला लागणार निकाल
3 मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर; ठिकठिकाणी रस्ते, रेल्वे वाहतूक बंद
Just Now!
X