नवल
संजयंत सहस्रबुद्धे – response.lokprabha@expressindia.com

स्कॉटलंडमध्ये जन्मलेले, ग्रेट ब्रिटनच्या मालकीचे आणि महाराष्ट्रातील शहराचे नाव धारण केलेले एस. एस. सातारा हे जहाज १९१० साली ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात बुडाले. त्याचा ठावठिकाणा लागल्यावर आता ते खोल पाण्यातील पाणबुडय़ांसाठी आकर्षण झाले असून ऑस्ट्रेलियाच्या वारसास्थळात गाजते आहे.

काही आठवडय़ांपूर्वी जहाजप्रवासादरम्यान नौदल नकाशावर (नॉटिकल चार्ट) एस. एस. चिल्का या द्वितीय विश्वयुद्धकालीन बुडालेल्या प्रवासी / मालवाहू जहाजाची माहिती मिळाली. ते जपानी पाणबुडीद्वारा बुडवले गेले हे कळले. त्या कंपनीच्या आणखी बोटींबद्दल माहिती तपासली असता, स्टिम शिप सातारा (एस. एस. सातारा) नावाच्या दोन जहाजांची माहिती मिळाली. महाराष्ट्रातील सातारा हे नाव पाहताच उत्सुकता चाळवली.

त्यातील पहिल्या ‘सातारा’ची ब्रिटिश इंडिया स्टीम शीप कंपनी, ग्लासगो, ग्रेट ब्रिटनद्वारा बांधणी करण्यात आली होती. भारत-आफ्रिका व्यापारासाठी कोलकाता बंदरातून तिचा वापर केला गोला होता. सुएझ कालवा सुरू झाल्यावर त्यामाग्रे भारतातून कोलकाता-पोर्ट लुई-मॉरिशस सेवा सुरू करणारी ती पहिली बोट होती. याच बोटीने १८६९ कोलकाता-मॉरिशसनंतर १८७२ मध्ये एडनमध्ये पी. अ‍ॅण्ड ओ. लाइन्सच्या सहकार्याने एडन-झांजिबार सेवा सुरू केली. हीच सेवा पुढे मासिक संपर्क सेवा म्हणून कार्यरत केली गेली. ही सेवा नंतर १८७६ मध्ये मोझांम्बिकपर्यंत वाढवली गेली. १८७४ मध्ये याच बोटीने बी. आय. होमलाइनच्या झेंडय़ाखाली लंडन – बसरा सेवा सुरू झाली. अशी ही नवीन सेवा सुरू करणारी एस. एस. सातारा सेवावयाच्या समाप्तीनंतर जहाजतोडय़ाच्या हातोडय़ांना बळी पडली.

बी. आय. होमलाइन ही कंपनी आपल्या जहाजांना राजे-महाराजांच्या शहरांची किंवा ईस्ट इंडिया कंपनीशी जोडलेल्या शहरं किंवा तलावांची, नद्यांची नावे देत असे. त्यामुळे साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान तसंच साताऱ्यातील महाराट्टा पलटणीचा डेपो या महत्त्वामुळे या बोटीला एस. एस. सातारा हे नाव दिले गेले. (संदर्भ- कॅप्टन बर्डवुड -नॉटिकल कॉलेज साऊथ हॅम्पटन आणि महाराट्टाच्या कर्नल बर्डवुड यांच्या वंशजांनी दिलेली माहिती) बीआय होमलाइनच्या शिपलिस्टमध्ये मराठी शहरे किंवा गावांच्या नावाने आणखी काही बोटी होत्या, पण एस. एस. सातारा हे नाव असलेल्या बोटी दोनच. या दोन्ही बोटींचे भाग्य वेगवेगळे. एक प्रतिथयश पण शेवटी जहाजतोडय़ांच्या हातोडय़ांना बळी पडली, तर दुसरीचा दोन कप्तानांच्या भांडणात खवळलेल्या सागराने बळी घेतला; पण ७४ वर्षांनंतर ती समुद्रतळाशी योगायोगाने सापडली. सध्या ती खोल समुद्रात जाणाऱ्या जगभरातील साहसी पाणबुडय़ांना प्रेरणा देणारी ठरली आहे. एक सागरावर सत्ता गाजवून क्षितिजपार गेली, तर तिची वारस सागरतळाची सत्ता गाजवत आहे. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्याचा विजयी वारसा सुदुर ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये, मरिन हेरिटेज साइट म्हणून चिरंजीव झाला आहे. या एस. एस. साताराच्या इतिहासाबरोबरच वर्तमानातील उज्ज्वल कारकिर्दीची माहिती देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

एस. एस. सातारा २० एप्रिल १९१० सील रॉक, न्यू साऊथवेल्स ऑस्ट्रेलिया पोर्ट न्यू कॅसल, एनएसडब्ल्यूहून सिंगापूरला कोळसा घेऊन जात होती. पण खराब सागरी हवामानात खडकाला टक्कर दिल्याने तळाला गेली. अपघाताची जबाबदारी जहाजाच्या मास्टर चार्लस अल्फ्रेड हगलवर आली. स्वत: मास्टर पायलट असताना जहाजाच्या परिचलनाची जबाबदारी कॅप्टन बिनस्टीड यांना दिल्यामुळे, कॅप्टन हगलचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले गेले.

जहाजाने बुडण्याच्या दिवसापर्यंत भेट दिलेली महत्त्वाची बंदरे म्हणजे डम्बरटन, ग्लासगो,  फरमेंटल (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया), ऑडिलेड, मेलबर्न, सिडनी, न्यू कॅसल (कोळसा लादण्यासाठी), क्वीन्सलॅन्ड ही होती. हा मार्ग जहाजाने साडेसात वष्रे वापरला होता. प्रवासाची सुरुवात भारतातून घडय़ाळाच्या सुलटय़ा तसंच उलटय़ा दिशेने असलेल्या मार्गाने कोलकाता ते कोलकाता असा असे. तसेच कधी कधी मुंबई आणि कोलंबोचा मार्गसुद्धा वापरत असे.

‘एस. एस. सातारा’द्वारे केल्या जाणाऱ्या मालवहनात मुख्यत्वे कोळसा, भारतातील लष्करी छावण्यांसाठी घोडे, सामान्य व्यापारी माल, तसंच काही प्रवासी असत. ऑस्ट्रेलिया ते इंग्लंडसाठी ट्रान्झिट कार्गो असेल तर ते व्हाया सिंगापूर किंवा मुंबईमाग्रे जात असे.

‘सातारा’च्या शेवटच्या प्रवासाची सुरुवात न्यू कॅसलहून झाली. कोलकात्याला जाण्यासाठी ग्लॅडस्टोन (क्वीन्सलॅन्ड) माग्रे ५७०० टन कोळसा घेतला होता. ग्लॅडस्टोनला बोटीवर घेतल्या गेलेल्या १०० घोडय़ांच्या देखरेखीसाठी दोन काळजीवाहक आणि ८४ परिचलन चमू तसंच कॅप्टन बिनस्टीड, क्वीन्सलॅन्ड पायलट प्राधिकारणाचा मार्गदर्शक नाविक म्हणून बोटीवर होता. ग्रेट बेरियर रीफ आणि टोरेसच्या सामुद्रधुनीतून एस. एस. ‘सातारा’ला खुल्या समुद्रात सुरक्षित पोहोचवणं ही  त्याची जबाबदारी होती.

न्यू कॅसल बंदर सोडल्याबरोबरच जहाजाला वादळी समुद्राचा सामना करावा लागला. मार्गक्रमणाच्या मुद्दय़ावरून कॅप्टन हगल आणि कॅप्टन बिनस्टीड यांच्यात मतभेद झाल्याने कॅप्टन हगलने जहाजाचा ब्रीज (नियंत्रण मनोरा डेक) सोडला. जहाजासमोर अडीच मल पुढे पोर्ट स्टीफन होते. २० एप्रिल १९१० ला सकाळी साडेनऊ वाजता जहाजाने मार्ग ३० अंशाने बदलला आणि वादळात बोरोगटन बेटाजवळून जाऊ लागले. समोरच शुगर लोफ पॉइंट आणि सील रॉक बेट येत होते. (१८९५ मध्ये सील रॉकला धडक दिल्याने एस. एस. कॅटरथन या जहाजाने ५५ माणसांचा बळी घेत सागरतळ गाठला होता.)

कॅप्टन बिनस्टीडने पाच मल अंतर वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ‘एस. एस. सातारा’ला शुगरलोफ पॉइंट आणि सील रॉकच्या मधून नेण्याचा निर्णय घेतला. ११.२५ ला थर्ड ऑफिसर जॉन पासमोरला मार्गाविषयी विचारणा करून त्याने लॉग एन्ट्री केली. ११.३० ला कॅप्टन बिनस्टीडने परत मार्ग ४५ अंश बदलला. बारा वाजता सेकंड ऑफिसर रिडिंगने थर्ड ऑफिसर पासमोरकडून चार्ज घेतला. दुपारी १२.०७ ला कॅप्टन हगल परत ब्रीजवर आले आणि त्यांनी कॅप्टन बिनस्टीडबरोबर मार्गाबद्दल संभाषण केले.

१२.१५ वाजता ‘सातारा’ने सील रॉकपासून अंदाजे चार किमीवर असलेल्या सात मीटर बाय ३० मीटर उंचीच्या लिटिल एडिथ ब्रेकर्स रीफला धडक दिली. कॅप्टन बिनस्टीडने इंजिन थांबवण्याची  आज्ञा दिलेली होती. तिचे उल्लंघन करून कॅप्टन हगलने पुन्हा रीफला धडक दिली. चीफ इंजिनीअर थॉमस ब्लॅकनी इंजिन रूममध्ये बरेच पाणी घुसल्याची कल्पना दिली. त्यामुळे ‘सातारा’ला सील रॉक लाइट हाऊसच्या उत्तरेच्या सागर किनारी बीचवर नेण्याचा निर्णय घेतला. उतरण्यासाठी लाइफ बोट तयार ठेवल्या गेल्या. जहाजाचा बो (जहाजाचा पुढचा भाग) समुद्रात खोल जात होता, त्यामुळे अ‍ॅफ्ट म्हणजे जहाजाचा मागचा भाग आणि सुकाणू पाण्याच्या बराच बाहेर आल्याने वेग मंदावला होता. वेस्ट बीच जवळच होता पण तोपर्यंत जहाजांचा पंखाही पाण्याबाहेर आल्याने ‘सातारा’ समुद्रावर काही मिनिटांचीच पाहुणी होती.

त्याच वेळी नॉर्थकोस्ट सी नेव्हिगेशन कंपनीच्या २४० फूट लांब १,२९० टनी प्रवासी/ मालवाहू नौकेच्या म्हणजेच एस. एस. ओराराच्या कॅप्टन हंटरचे लक्ष ‘सातारा’कडे गेले. (एस. एस. ओरारा नंतर दुसऱ्या महायुद्धातील हर मॅजेस्टीज ऑक्झलरी शिप म्हणजेच एच. एम. ए. एस. ओरारा ऑक्झेलरी माईन स्वीपर आणि तरंगत्या क्रूला प्रशिक्षण देणारी नौका होती. दुसऱ्या महायुद्धातसुद्धा तिने उल्लेखनीय कामगिरी केली होती.)

ओरारा सील रॉकच्या बाहेरून समुद्रातूनच मार्गक्रमण करत असताना शुगरलोफ पॉइंटच्या लायनीत आल्यावर ‘सातारा’ची स्थिती पाहून ती संकटात असल्याची खात्री पटली. कॅप्टन हंटरने ओराराला ‘सातारा’च्या मदतीसाठी तातडीने वळवायची आज्ञा देऊन वेग वाढवला. तोपर्यंत ‘सातारा’च्या लाइफ बोटस् समुद्रात सोडल्या गेल्या होत्या. ओरारा तातडीने तिथे पोहोचलीही होती.

दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पाच माणसे जहाजावर असताना ‘एस. एस. सातारा’ बुडाली. त्या पाच माणसांनी समुद्रात उडय़ा मारून जहाजाच्या तरंगणाऱ्या अवशेषांना पकडून आपला जीव वाचवला. उलटलेल्या एका लाइफ बोटमधे असलेल्या ‘सातारा’च्या चीफ इंजिनीअर स्मिथ यांना ओराराचा सेकंड ऑफिसर बेन्सनने खवळलेल्या समुद्रातून वाचवले. एव्हाना एस. एस. डोिरगो हे जहाजही अपघातस्थळी पोहोचून उत्तरेकडे पाच जणांच्या शोधात गेले आणि त्याने कॅप्टन हगलसह सर्व पाच जणांना वाचवून बोटीवर घेतले. ओरारा आणि डोिरगोने सील रॉक बीचच्या सुरक्षित स्थळी जाऊन ‘सातारा’वरील सर्वाना डोरिंगोवर पाठवले. संध्याकाळी ५.१५ ला निघालेली डोिरगो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता सिडनी बंदरात पोहोचली.

‘सातारा’ला बुडू लागल्यावर शुगर लोफ बीच किनाऱ्यावर डुकरे, मेंढय़ा, कोंबडय़ा, बदके यांचे मृतदेह पोहोचू लागले. ‘सातारा’च्या एका अधिकाऱ्याचा कुत्रा बुडाला असे मानले गेले होते, तो काही दिवसांनी शुगरलोफ लाइट हाऊसच्या काळजीवाहू लाइट कीपरला बीचवर फिरताना मिळाला.

यानंतर ‘एस. एस. सातारा’ हे नाव इतिहासजमा झाले. पण बरोब्बर ७४ वष्रे पाच महिने १३ दिवसांनी ऑस्ट्रेलियन सरकारच्या सागरी वारसास्थळांच्या न्यू साऊथवेल्स (एनएसडब्ल्यू) राज्याच्या यादीत सन्मानाने नोंदवले गेले. त्याला कारणीभूत ठरले ते पोर्ट स्टीफन आणि पोर्ट न्यू कॅसलचे हौशी पाणबुडे. समुद्रात दुसऱ्याच एका जहाजाच्या अवशेषांच्या शोधात असताना त्यांना ‘एस. एस. सातारा’ सापडली.

आज ‘एस एस सातारा’चे अवशेष (ब्रेकेज) ४४ मीटर खोल समुद्रात विखुरले आहेत. तिचा स्टर्न (मागचा हिस्सा) रिफवर, तर बो (पुढचा हिस्सा) वाळूत आहे आणि नाल्यासारख्या लांब खड्डय़ात बो उत्तरेकडे तोंड करून चिरनिद्रा घेत आहेत.

सील रॉक्सच्या दक्षिण पश्चिमेस स्थित ‘सातारा’ ज्या एडिथ ब्रेकर्समुळे ती बुडाली त्यापासून लांब आहे. ‘सातारा’ची जीपीएस स्थिती ३२ अंश २८’ ५०’’ विषुववृत्ताच्या दक्षिण अक्षांश, आणि १५२ अंश ३१’ ११’’ पूर्वेस स्थित आहे. ही स्थिती अवर ६६ जीपीएस यंत्रणेप्रमाणे आहे. ती दुसरे मॅप डेक्टम वापरणाऱ्यास अवशेषांपासून २२० मीटर लांब ठेवेल.

१९८४ पासून जगातील हजारो डायवर्सनी ‘सातारा’च्या अवशेषांना भेट दिली आहे, स्कॉटलंडमध्ये जन्मलेली, ग्रेट ब्रिटनच्या मालकीची आणि महाराष्ट्रातील सातारा या शहराचे नाव धारण करून ऑस्ट्रेलिया आणि भारताला व्यापारिक संबंधाने जोडणारी ‘आय एस एस सातारा’ ही; डायविंग अ‍ॅण्ड रिसर्च टुरिझममुळे (पाणबुडे शोध पर्यटन) चिरंजीव झाली आहे. तिच्या डायिवग संकेतस्थळाला ७० लाखांपेक्षा जास्त लोकांनी भेट दिल्याचे दिसते.  ‘सातारा’च्या अवशेषांमध्ये डायिवग करताना ग्रेनर्स, शार्कस्, वॉबगॉगस् आणि रेडमोवाग माशांच्या झुंडी दिसतात.

पोर्ट स्टीफनहून ४३ किमी आणि पोर्ट फोरस्टरहून ४० किमी अंतरावर असल्याने जास्त डायवर्स या साईटवर पोहोचत नाहीत. इथे प्रवाह वेगवान असतो आणि पाणी पारदर्शक, स्वच्छ असते. हे अवशेष खोल पाण्यात असल्याने फक्त अनुभवी डायवर किंवा डायिवग कंपनीशी संपर्क करून डायिवग करता येईल. मराठी दर्यावर्दी समूहाच्या हौशी पाणबुडय़ांनी किंवा महाराष्ट्रातील हौशी पाणबुडय़ांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली तर ‘एस एस सातारा’ बघण्याचा प्रयत्न करावा.

महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्रालय आणि साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य त्या प्रक्रियेद्वारे महाराष्ट्र – एन एस डब्ल्यू आणि सातारा पोर्ट स्टीफन आणि पोर्ट फोरस्ट यांच्याशी सामंजस्य करार करावा. या शहरांमध्ये एक नवीन वारसा, पर्यटन, आíथक विकासाची देवाणघेवाण सुरू होऊ शकेल, ज्याचा सामाईक नफा सर्वाना मिळेल.

सातारा जिल्हाधिकारी, सनिक स्कूल सातारा यांनी इंडियन मॅरीटाइम फाऊंडेशन अध्यक्षांच्या सहयोगाने ऑस्ट्रेलियन सरकारशी संपर्क साधून ‘सातारा’चे काही अवशेष मिळवून ते सनिक स्कूल आवारात तसेच आयएमएम संग्रहालय पुणे येथे ठेवावेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर ‘एस. एस. सातारा, ए सिस्टर फ्लोटिंग सिटी इज ऑन द सी बेड ऑफ ऑस्ट्रेलिया. इन द डायरेक्शन ऑफ अ‍ॅरो इन न्यू प्रोव्हिन्स’ असा दिशादर्शक फलक लावावा. त्यावर ‘सातारा’चे फोटो असावेत. एनएसडब्ल्यू मरिन हेरिटेज डिपार्टमेंटकडून माहिती मिळवून ती लोकांना मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा.

‘एस. एस. सातारा’चा हा प्रवास पाहिल्यावर काही प्रश्न पडतात. पर्यायदेखील सुचतात. मध्यंतरी महाराष्ट्र सरकार आयएनएस विराटला बुडवून डाईिवग सेंटर करण्याची भाषा करत होते. त्यांनी विराटच्या मागे न लागता महाराष्ट्रातील काही धरणात बुडालेली मंदिरं (उदा. पळसदेव, उजनी जलाशय भिगवण, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) पर्यटकांसाठी खुली केली तर हौशी पाणबुडे संस्थाची निर्मिती होईल आणि परकीय चलनही मिळू शकेल. मोठे मोठे सामंजस्य करार करून प्रत्यक्षात काहीच न करणाऱ्या सरकारने असे उपयोगी छोटे छोटे प्रयोग यशस्वी केले तर त्याचा फायदा होऊ शकेल. महाराष्ट्रात जागतिक श्रेणीचे पाणबुडे तयार होण्याबरोबरच डाईिवग टूरिझम वाढू शकेल. यासाठी इंडियन मॅरीटाइम फाऊंडेशन, पुणे तसंच मेस्को टूरिझम, पुणे (ज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत) भागीदार असतील. कारण त्यांचे क्षेत्र, अनुभव आणि क्षमता वादातीत आहेत. एम.टी.डी.सी.ला यापासून १०० मल लांबच ठेवावे.

‘एस. एस. सातारा’च्या निमित्ताने यातील काही गोष्टी झाल्या तरी उत्तम. मराठी माणसाने जगात फिरताना खास मराठी तसंच मराठी नसलेल्या पण महाराष्ट्रातील एखादे नाव धारण करणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित करावे. पुढील पिढीतील मराठी पर्यटकांस त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकेल.

स्टीम शिप सातारा : तांत्रिक माहिती

  • जहाजाचे नाव : एस. एस. सातारा
  • अधिकृत क्रमांक : ११३९९५
  • झेंडा राष्ट्रीयता : ग्रेट ब्रिटन, लाल झेंडय़ाच्या उजव्या कोपऱ्यात वर युनियन जॅक
  • जहाज नोंदणी संस्था : आय.एम.ओ. (आंतरराष्ट्रीय जहाजराणी संगठन)
  • बांधणीचे वर्ष : १९०१
  • जलावतरणाची तारीख : ३० ऑक्टोबर १९०१.
  • जहाजाच्या पहिल्या प्रवासाची तारीख : १२ डिसेंबर १९०१.
  • जहाजाचा प्रकार : प्रवासी तसंच मालवाहक.
  • संचालन शक्ती : पोलादी पंख्यासह दोन डोलकाठी (मास्ट)सह.
  • जहाज बांधणी कंपनी : विल्यम डेनी आणि बंधू, डम्बरटन, स्कॉटलंड.
  • बांधणी प्रकल्प गोदी क्रमांक : प्रकल्प क्रमांक ६५०.
  • जहाजाचे वजन : ५१५६ ग्रॉस रजिस्टर्ड टन्स् ३३२७ नेटरजिस्टर्ड टन्स्.
  • जहाजाची लांबी : ४१०.८ फूट.
  • जहाजाची रुंदी : ५०.७ फूट.
  • ड्राफ्ट / खोली : २९.१  फूट.
  • इंजिनची माहिती :- बांधणी डेनी अ‍ॅण्ड कंपनी, डम्बरटन, स्कॉटलंड. एक स्क्रू पंखा, टीथ्री सििलडर (२६.५, ४२, ६६.५ * ५१ इन,) शक्ती ३८३ एनएच पी.
  • वेग : १० नॉटिकल मल (११.६ जमिनी मल अंदाजे, १७.२ कि.मी.)
  • प्रथम मालक : ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी, ग्लासगो, स्कॉटलंड.
  • गृहबंदर नोंदणी : ग्लासगो, स्कॉटलंड.
  • समाप्ती वर्ष : १९१०.
  • कारण : बुडाली.

छायाचित्र सौजन्य : मिशेल मॅक्फिडन स्कुबा डॉट इन्फो आणि स्टेट लायब्ररी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
सौजन्य – लोकप्रभा