टी-सीरिज, सारेगम, युनिव्हर्सल या मोठ्या म्युझिक कंपन्यांवर ईडीने छापे घातले आहेत. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये भारतात आणल्याचा आरोप या कंपन्यांवर लावण्यात आला आहे. शुक्रवार सकाळपासूनच ईडीकडून याविषयीच्या कारवाईस सुरुवात करण्यात आली. २०१५ मध्ये ‘इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी’ (आयपीआरएस) आणि ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड’ (पीपीएल) यांनी आर्थिक फसवणुकीच्या कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘बिजनेस स्टॅण्डर्ड’ने प्रसिद्ध केली.

सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार टी-सीरिज, वायआरएफ म्युझिक, सारेगम, युनिव्हर्सल या कंपन्यांची चौकशी करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी गीतकार जावेद अख्तर यांनी आयपीआरएस आणि पीपीएल या दोन संस्थांकडे रॉयल्टी मिळण्यात दिरंगाई केली जात असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतरपासूनच ईडी या कंपन्यांवर नजर ठेवून होते. अखेर शुक्रवारी ईडीने या कंपन्यांवर छापे घातले.

१९६९ मध्ये स्थापन झालेली ‘इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी’ (आयपीआरएस) ही संस्था रेस्तराँ, रेडिओ वाहिन्या, टेलिव्हिजन वाहिन्यांकडून गाण्यांवरील रॉयल्टी आकारून ते शुल्क मूळ संगीतकार, गायक, प्रकाशकांमध्ये वितरित करते. तर ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड’ (पीपीएल) ही संस्था जवळपास सात लाख गाण्यांच्या पब्लिक परफॉर्मन्स आणि रेडिओ ब्रॉडकास्टिंग अधिकारांवर नजर ठेवून असते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.