भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेत असताना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या प्रमुखांनी हजेरी लावली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद राजपक्षे आदींचा समावेश होता.
भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे, नेपाळी पंतप्रधान सुशील कोईराला आणि मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम आदी राष्ट्रप्रमुखांनीही उपस्थित राहत शपथविधी सोहळ्याची शोभा वाढवली. सुमारे चार हजार आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
भारताच्या पूर्व सीमेवरील बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या पूर्वनियोजित जपान दौऱ्यावर असल्यामुळे या सोहळ्यास उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्यांच्या वतीने बांगलादेशच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती शिरीन चौधरी उपस्थित होते. भारतीय पंतप्रधानांच्या शपथविधीस ‘सार्क’ राष्ट्रांच्या प्रमुखांनी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. सार्क राष्ट्रांव्यतिरिक्त मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलम् यांनीही समारंभास हजेरी लावली.
भारतात आलेल्या दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या सर्वच प्रमुखांसह मोदी मंगळवारी द्विपक्षीय संबंधांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहेत. तसेच शपथविधीनंतर होणाऱ्या भोजन समारंभादरम्यानही या नेत्यांमध्ये अनौपचारिक पद्धतीने चर्चा होणार आहे.