महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेला शबरीमला वाद ही पक्ष म्हणून भाजपासाठी सुवर्णसंधी असल्याचे विधान केरळचे भाजपा अध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लाई यांनी केल्याचा आरोप होत आहे. यामुळे श्रीधरन व भाजपा टिकेचे लक्ष्य होऊ शकतात. एक ध्वनीफित सध्या व्हायरल झाली असून यामध्ये श्रीधरन असेही सांगताना ऐकायला मिळत आहेत की, “शबरीमला मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. जर महिलांनी या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर गाभाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात येतील.”

कोझिकोडेमध्ये युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्रीधरन यांनी सदर उद्गार काढल्याचे, त्यांनी या परिस्थितीचं वर्णन भाजपासाठी सुवर्णसंधी असा केल्याचे व ही क्लिप व्हायरल झाल्याचे वृत्त न्यूज 18नं दिलं आहे. शबरीमलाचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवरू यांना न्यायालयाचा अवमान करून मंदिराचे दरवाजे बंद करण्यात स्वारस्य नाही. परंतु श्रीधरन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मात्र त्यांनी हा निर्णय अमलात आणण्याचे ठरवल्याचे सांगण्यात आले आहे.

“तांत्रिक समुदायाला भाजपा व प्रदेशाध्यक्ष यांच्यावर जास्त विश्वास आहे. ज्यावेळी महिलांनी मंदिर प्रवेशाचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी मला बोलावलं. मी त्यांना साथ देण्याचा शब्द दिला आणि योगायोग म्हणजे तशी वेळ आलीच. जर मंदिराच्या गाभाऱ्याचे दरवाजे बंद केले तर तो कोर्टाचा अवमान होईल अशी त्यांना भीती वाटतेय. त्यामुळे त्यांनी काही मोजक्या जणांशी संपर्क साधला त्यात मी होतो,” श्रीधरन म्हणाले.

मी त्यांना सांगितलं की, “तुम्ही एकाकी नसून कोर्टाच्या अवमानप्रकरणी कारवाई झाली तर ती आधी आमच्यावर होईल. त्यांच्याबरोबर लाखो लोक असतील. आपल्या शब्दावर विसंबून त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिस व प्रशासनाची परिस्थिती विचित्र झाली आहे. मला आशा आहे, की ते हीच भूमिका परत घेतील. कोर्टाच्या अवमानप्रकरणी मी पहिला आरोपी असून मुख्य पुजारी दुसरे आरोपी आहेत,” हे सांगतानाच दोघेही एकत्र आल्यामुळे पुजाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे श्रीधरन सांगताना ऐकायला येत आहे.

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मी कायदेशीर सल्ला देत होतो असे श्रीधरन म्हणाले, मात्र त्यांनी सुवर्णसंधी या शब्दाच्या उपयोगाबद्दल भाष्य करणं टाळलं. जर शबरीमलासारख्या वादाकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पक्षासाठी सुवर्णसंधी या दृष्टीकोनातून बघत असतील तर हे प्रकरण त्यांच्यावर शेकू शकतं.