केरळमधील शबरीमला मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. मास्क आणि करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र दाखवत भाविकांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर मासिक पूजेसाठी खुलं करण्यात आलं आहे, मात्र मल्याळम महिना तुलमच्या निमित्ताने भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. पाच दिवसांच्या पूजेसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं असून करोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी केली जात आहे. करोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून शबरीमला मंदिरदेखील बंद होतं.

शनिवारी दर्शन घेण्यासाठी २४६ लोकांनी ऑनलाइन बुकिंग केलं होतं. दिवसाला फक्त २५० लोकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. केरळमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने मंदिराकडून सर्व काळजी घेतली जात आहे. करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र न आणणाऱ्यांसाठी रॅपिड टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अभिषेक करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण हे प्रणापपत्र ४८ तासांच्या आत काढलेलं असावं. मंदिरात १० ते ६० वयोगटातील भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय पारंपारिक पवित्र स्नानाला बंदी असून बेस कॅम्प किंवा मंदिराच्या मुख्य परिसरात रात्री थांबवण्यासही मनाई आहे.

“भाविकांना पवित्र स्नानासाठी परवानगी नाही. त्याच्या जागी शॉवर सिस्टीमची व्यवस्था केली जाणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पीटीआयशी बोलताना दिली होती. करोना स्थिती हाताळण्यावरुन सुरुवातीला कौतुक झालेल्या केरळमध्ये सध्या मात्र परिस्थिती गंभीर आहे. गेल्या महिन्यांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. जानेवारी महिन्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर केरळमध्ये सध्या तीन लाखांहून अधिक रुग्ण आहेत.