‘दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल’ हे महात्मा गांधी यांच्यावरचे गाणे म्हणजे इतर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे असे  वक्तव्य हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी केले आहे. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग अवलंब करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले म्हणून त्यांना हे गाणे समर्पित केले आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्येही या गाण्याचा समावेश होतो मात्र हे गाणे देशासाठी स्वातंत्र्य मिळवणाऱ्या इतर सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे अशी टीका विज यांनी केली आहे.

महात्मा गांधी यांच्या अहिंसेमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असे या गाण्यात म्हटले गेले आहे. मग नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह या आणि अशा इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात जे बलिदान दिले. त्यांचे महत्त्व मानायचे नाही का? असाही प्रश्न विज यांनी विचारला. या गाण्यात महात्मा गांधी यांची स्तुती करण्यासाठी जे शब्द वापरण्यात आले आहेत ते शब्द देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहेत असाही आरोप विज यांनी केला. ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

साबरमती के संत हे गाणे काँग्रेसच्या नेते, कार्यकर्ते म्हणत असतात. मात्र या गाण्यात फक्त महात्मा गांधी यांचेच महत्त्व विशद करण्यात आले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस ही आणि अशी किती तरी नावे घेता येतील ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती दिली. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्या सगळ्यांचे योगदान व्यर्थ गेले का? असा प्रश्न अनिल विज यांनी विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

साबरमती के संत हे गाणे १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या जागृती या सिनेमात समाविष्ट करण्यात आले आहे. कवी प्रदिप यांनी हे गाणे लिहिले आहे. तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी हे गाणे गायले आहे. या सिनेमाला ६१ वर्षे उलटून गेली आहेत. अशात आता यातील गाण्यावर अनिल विज यांनी आक्षेप नोंदवला आहे.