अखेर मोदींनी असहिष्णुतेवर मौन सोडले
प्रत्येक नागरिक आणि त्याच्या विचाराला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. घडणारी प्रत्येक घटना गंभीर असून बुद्ध आणि गांधी यांच्या भूमीत मूल्याच्या विरोधातील कोणतीही बाब अस्वीकार्य आहे, असे स्पष्ट करून भारतात असहिष्णुतेला थारा नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
असहिष्णू घटनांबद्दल देश आणि परदेशात सर्वत्र चिंता व्यक्त होत असताना या मुद्याने मोदी यांचा लंडनपर्यंत पिच्छा पुरवला. यावर मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी लंडनमध्ये भारत-ब्रिटनच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या मुद्यांवर अखेर आपली भूमिका मांडावी लागली. मोदी यांच्या इंग्लडच्या तीन दिवसांच्या दौऱ्याला गुरुवारपासून प्रारंभ झाला. अपेक्षाप्रमाणे आज पत्रकार परिषदेत त्याचे प्रतिबिंब उमटले आणि पहिला प्रश्न यावरच विचारण्यात आला.
यावर बोलताना मोदी म्हणाले, भारत भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहे. या देशात सर्वच विचारांना आणि प्रत्येक नागरिकाला समान स्थान आहे. त्यांची आणि त्यांच्या विचाराच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. यासंदर्भात घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, प्रत्येक घटना आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही ते सहन करणार नाही. त्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होत आहे आणि पुढच्या काळात ती होतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मला ब्रिटनमध्ये येण्यापासून कोणीही अडवले नाही. मी २००३ मध्ये आलो होतो. वेळेअभावी त्यानंतर येत आले नाही. भारत आणि ब्रिटन आर्थिक संबंध मजबूत असून भारतात ब्रिटनची सर्वाधिक गुंतवणूक आहेत. ही प्रक्रिया अधिक सरल करण्यात येईल, तसेच भारत आणि ब्रिटन मुख्य कार्यकारी अधिकारी फोरम स्थापन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे आज विशेष विमानाने लंडन येथे आगमन झाले. त्यांचा हा पहिला ब्रिटन दौरा आहे. त्यांनी आज ब्रिटनच्या संसदेला संबोधित केले. दहशतवादाविरोधात संयुक्त लढण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी ते महाराणी एलिझाबेथ (व्दितीय) यांच्यासोबत भोजन करतील. भारतीय मालकीच्या लॅण्डरोवर व जॅग्वार या दोन मोटार कंपन्यांच्या कारखान्यास, तसेच सायंकाळी भारतीय नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. शनिवारी लंडन येथील आंबेडकर हाऊसचे लोकार्पण करतील.
मोदी विमानळाहून थेट जेम्स कोर्ट हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तेथे त्यांची एक झलक पाहण्यासाठी उभे असणाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मोदी, मोदी अशा घोषणाही त्यांनी दिल्या. मोदी यांनीही सुरक्षाकडे तोडून नागरिकांशी हस्तांदोलन केले.

९ बिलियन पौंडचे करार
भारत आणि ब्रिटनने गुरुवारी ९ बिलियन पौंड यांच्या कराराची घोषणा केली. नागरी अण्वस्त्र करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि संरक्षण, सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच रेल्वे रुपी बॉन्डची स्थापन करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरक्षा परिषदेसाठी समर्थन
ब्रिटनने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी ब्रिटनचे समर्थन असल्याचा पुनरुच्चार डेव्हिड कॅमरून यांनी केला.
दोनशे साहित्यिकांचे पत्र
मोदी यांचा इंग्लड दौरा सुरू होताच इंग्लडमधील दोनशेहून अधिक साहित्यिक व लेखकांनी असहिष्णूतेच्या मुद्यावरून इंग्लडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना पत्र पाठविले असून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र अबाधित राहावे, यासाठी त्यांनी मोदींवर दबाव आणावा, अशी मागणी केली आहे. हे पत्र पाठविण्याऱ्यांमध्ये प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी, नील मुखर्जी आणि मॅगी गिब्सन यांच्यासारख्या प्रख्यात साहित्यिकांचा समावेश आहे. दरम्यान, मोदी यांना संसदेच्या बाहेर याच मुद्यांवरून विरोधी फलकांचाही सामना करावा लागला.
ब्रिटनच्या संसदेत दहशतवाद
मोदी यांनी ब्रिटनच्या संसदेला संबोधित करताना दहशतवादाच्या मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या देशाला एकटे पाडावे आणि दशतवादाचा खात्मा करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवावी, असे आवाहन करून मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानावर निशाणा साधला.