केरळच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून रणकंदन माजलेलं असतानाच, शबरीमला मंदिर ही काही सेक्स टुरिझमची जागा नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्रावणकोर देवस्वोम मंडळाचे माजी अध्यक्ष पेरियार गोपालकृष्णन यांनी केलं आहे. शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही हे अयप्पाचं पवित्र स्थान आहे असं गोपालकृष्णन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शबरीमला मंदिरात जर महिलांनी प्रवेश केला तर आम्ही मंदिराला टाळे ठोकू अशी धमकीच इथल्या पुजाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे या मंदिरात ज्या दोन महिला प्रवेश करणार होत्या मात्र या धमकीमुळे महिलांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.

केरळच्या शबरीमाला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिक लोक याचा विरोध करीत आहेत. बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर महिलांना येथे प्रवेशापासून रोखण्यात आले. दरम्यान, पंबा येथील डोंगर चढून वार्तांकनासाठी मंदिरात प्रवेश करु पाहणाऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांच्या पुरुष सहकाऱ्याला आंदोलकांनी अडवले, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि दगडफेक करीत परत पाठवून दिले.

दरम्यान शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून राजकारणही पेटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवाद पसरवत असून अय्यपा धर्मस्थळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप केरळ सरकारने केला. केरळ सरकारच्या या आरोपांना भाजपानेही प्रत्युत्तर दिलं, केरळ सरकारच अयप्पा मंदिराची प्रतीमा मलीन करत असल्याचं आणि येथील तणावपूर्ण परिस्थितीला तेच जबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

असं असलं तरीही शबरीमला मंदिराविरोधात जाणीवपूर्वक अजेंडा राबवला जात असून हे पवित्रस्थान आहे सेक्स टुरिझमची जागा नाही असे वक्तव्य  त्रावणकोर देवस्वोम मंडळाचे माजी अध्यक्ष पेरियार गोपालकृष्णन केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे.