राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच सरकारवरील संकट वाढताना दिसू लागलं आहे. अशोक गेहलोत यांच्यासोबत राजकीय मतभेद शिगेला गेल्यानंतर काल (११ जुलै) रात्रीपासून २२ आमदारांसह दिल्लीत गेलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सचिन पायलट भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती ‘एनडीटीव्ही इंडिया’नं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

मध्य प्रदेश पाठोपाठ काँग्रेसच राजस्थानमधील सरकारही कोसळण्याची शक्यता दिसत आहे. राजकीय हालचाली तशा पद्धतीनं घडत असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतचे मतभेद विकोपाला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. एनडीटीव्ही इंडियानं यासंदर्भात सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं असून, सचिन पायलट सध्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत.

आपल्याकडे १६ काँग्रेस, तर ३ अपक्ष आमदार पाठिंशी असल्याचा दावा पायलट यांनी भाजपाकडे केला आहे. मात्र, भाजपाकडून पायलट यांना एक अट टाकण्यात आली आहे. अशोक गेहलोत यांचं सरकार पाडावं, असं भाजपाचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. भाजपानं सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला आहे. कारण राजस्थानमधील नेतृत्त्वाविषयी भाजपा विचारविनिमय करत आहे. त्यातच वसुंधरा राजे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या ४५ आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षश्रेष्ठीनं सचिन पायलट यांच्यासोबत चर्चा केल्याचंही समोर येतंय. सचिन पायलट यांची समजूत घालण्यात आली आहे. त्याचबरोबर अशोक गेहलोत यांच्यावर पक्ष नाराज असल्याचंही बोलून दाखवलं आहे.

आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यामुळे सचिन पायलट नाराज झाले. त्यांनी तातडीनं आमदारांना सोबत घेत दिल्ली गाठली. त्यानंतर राजस्थान सरकारवर अस्थिरतेचे ढग दाटून येताना दिसत आहे. सचिन पायलट लॉकडाउन लागू झाल्यापासूनच ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करत होते, अशीही माहिती समोर येतं असून, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.