काँग्रेस नेते सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशाबाबत चर्चा करण्यासाठी सचिन पायलट हे अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. राजस्थानात जी राजकीय उलथापालथ सचिन पायलट यांनी घडवली होती त्यानंतर ते वेगळी चूल मांडतील असं चित्र दिसत होतं. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या शिष्टाईमुळे सचिन पायलट यांचं बंड शमलं. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. राजस्थान काँग्रेसमधल्या अंतर्गत लाथाळ्या सचिन पायलट यांच्या बंडानंतर पाहण्यास मिळाल्या. आता बंड शमल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पायलट हे गेहलोत यांच्या भेटीला पोहचले आहेत. शुक्रवारी होणाऱ्या अधिवेशनात काय रणनीती आखायची या चर्चेत ते सभागी झाले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

मागच्याच महिन्यात सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उगारला होता. सचिन पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरुनही हटवण्यात आलं. त्यानंतर सचिन पायलट हे भाजपासोबत हातमिळवणी करतील किंवा वेगळा पक्ष स्थापन करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एवढंच नाही तर गेहलोत सरकार अल्पमतातही आलं होतं. कारण आपल्यासोबत १८ पेक्षा जास्त आमदार घेऊन सचिन पायलट बाहेर पडले होते.

या दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी काँग्रेसमध्ये झडल्या. अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना निक्कमा म्हटलं होतं. त्यामुळे सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते. दरम्यान आधी आरोपांच्या फैरी झाल्यानंतर नंतर चर्चांच्या फेऱ्या झाल्या. सचिन पायलट यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीच सचिन पायलट यांची घरवापसी होणार हे निश्चित झालं होतं. अपेक्षेप्रमाणे तेच घडलं. आता बंड थंड झाल्यानंतर सचिन पायलट हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. शुक्रवारी होणाऱ्या अधिवेशानासंबंधीची चर्चा या दोघांमध्ये होते आहे.