राजस्थानात जवळपास महिनाभरापासून चाललेल्या सत्ता नाट्यानंतर बंडखोर नेते सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसमधील वापसीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महिनाभरापासून राजस्थानातील संपूर्ण घडामोंडीवर मौन बाळगून असलेल्या सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क साधला असून, भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती काँग्रेसच्या दोन नेत्यांनी दिली आहे.

सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क केल्याचं वृत्त हिंदुस्थान टाइम्स काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतचे मतभेद टोकाला गेल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अचानक बंडाचं निशाण फडकावलं होतं.

गेहलोत यांच्याविरोधात केलेल्या बंडानंतर सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह जयपूर सोडलं होते. तब्बल महिनाभर हा गोंधळ सुरू असताना सचिन पायलट यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. महिना उलटल्यानंतर आणि राजस्थानातील चर्चा थांबल्यानंतर पायलट यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क केल्याचं राजस्थान मुद्याशी संबंधित असलेल्या काँग्रेस दोन वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “राहुल गांधींकडे अध्यक्ष होण्याची क्षमता आणि योग्यता, मात्र…”, शशी थरुर यांनी मांडलं स्पष्ट मत

पायलट यांनी संपर्क साधून काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेटीसाठी वेळ मागितल्याचं एका नेत्यानं सांगितलं. पायलट सध्या अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या संपर्कात असून, आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. राहुल गांधी यांनी पायलट यांची भेट घेण्यास संमती दिली की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान, सचिन पायलट यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. त्याचबरोबर त्यांनी यासंबंधित अधिक माहिती देण्यासही नकार दिला.

आणखी वाचा- “भाजपा सरकार देशातील साधन संपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी काय करत आलीये”

आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणात राजस्थान पोलिसांनी सचिन पायलट यांना नोटीस पाठवली होती. नोटीस दिल्यानंतर सचिन पायलट यांची नाराजी समोर आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतचे मतभेदही चव्हाट्यावर आले होते.