राजस्थानातील राजकीय पेचप्रसंग मिटल्यानंतर काँग्रेसने सचिन पायलट यांच्यासह बंडखोरांनी उपस्थित केलेल्या तक्रारी ऐकण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांचा समावेश आहे. राजस्थानात अविनाश पांडे यांच्या जागी माकन यांना प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयावर आभार व्यक्त केले आहेत. पायलट यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “राजस्थानात समन्वय स्थापित करण्यासाठी आज अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांच्या रुपात तीन सदस्यीय समिती नियुक्त केल्याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाचे आभार. मला पूर्ण विश्वास आहे की, समितीच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानात संघटनेला एक नवी दिशा मिळेल.”

पायलट यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं, “अजय माकन यांची राजस्थान प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन. आपल्या नियुक्तीमुळे निश्चितच राजस्थान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छा-आकांक्षांना बळ मिळेल. उज्वल भविष्याच्या आशेसह मी अजय माकन यांचे वीरभूमी राजस्थानात स्वागत करतो.”

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते मंगळवारी जयपूरला परतले. यावेळी काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांना सगळ्या तक्रारी दूर केल्या जातील, असे आश्वास देण्यात आले होते.