भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही, असं वादग्रस्त विधान काँग्रेस खासदार जसबीर एस. गिल यांनी केलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्याविरोधात बोलणाऱ्या भारतातील सेलिब्रेटिंवर टीका केली.

खासदार गिल म्हणाले, “जो अक्षयकुमार पंतप्रधानांना तुम्ही आंबे खाता का? किंवा इतर काय खाता? असं विचरतो. त्याचा बुद्ध्यांक यापेक्षा जास्त नाही. या व्यक्तीचं म्हणणं कोणीही गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांविरोधात ट्विट करुन सरकारची आतली भीती बाहेर आली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात ज्यांनी विधानं केली त्यांची लायकी नाही, त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. मी आधीच म्हटलं होत की, सचिन तेंडुलकरने केवळ आपल्या मुलाला आयपीएलमध्ये जागा मिळावी यासाठी सरकारची लाईन बोलून दाखवली. मी जनतेवर हे सोडून देतो की त्यांनी निर्णय घ्यावा की, हा माणूस भारतरत्नच्या लायकीचा आहे का? मला तर सचिन तेंडुलकर भारतरत्नच्या लायकीचा वाटतं नाही”

गिल यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी गिल यांना तुम्हाला कोणी गांभीर्यानं घेत का ते आधी बघा असा सल्ला दिला आहे तर काहींनी गिल यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत प्रत्येक तर्कसंगत व्यक्तीनं सारासार विचार करुन बोलायला हवं असं म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाला नुकताच विविध परदेशी सेलिब्रेटिंनी ट्विटदवारे पाठिंबा दिला. याद्वारे त्यांनी भारत सरकारवर टीकाही केली होती. मात्र, सोशल मीडियातून याची चर्चा सुरु झाल्यानंतर त्यावर अनेक भारतीय सेलिब्रेटिंनी सरकारची बाजू घेत परदेशी सेलिब्रिटिंना भारताच्या अंतर्गत बाबींत नाक न खुपसण्याचा सल्ला देत सुनावलं होतं. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचाही समावेश होता.