News Flash

ठाकरे सरकारला धक्का! मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही ‘एनआयए’कडे

एटीएसकडून सुरू होता तपास

संग्रहित छायाचित्र

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवलेला असतानाच केंद्राने ठाकरे सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे दिला होता. मात्र, आता हे प्रकरणही एनआयएकडे देण्यात आलं असून, यासंदर्भातील आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काढले आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

अंबानी यांच्या घराजवळ एक जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आली होती. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आला होता. मात्र, केंद्राने एनआयएकडे तपास सोपवला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अंबानी स्फोटकं प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळून आला होता.

हिरेन यांच्या मृत्यूवरून विरोधी पक्ष भाजपाने सरकारला धारेवर धरलं होतं. नंतर सरकारने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. या प्रकरणात एटीएसकडून तपास सुरू झाला होता. तर दुसरीकडे एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच केंद्राने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे दिला आहे. त्यामुळे अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन या दोन्ही प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे.

एटीएसकडून पोलीस अधिकाऱ्यांची कसून चौकशी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मागील दोन ते तीन दिवसांपासून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी एटीएसकडून सुरु होती. मनसुख हिरेन यांचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची टीम आणि इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी ठाणे एटीएस कार्यालयात जाऊन तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 2:04 pm

Web Title: sachin vaze case mansukh hiren death case taken over by nia bmh 90
Next Stories
1 संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे; बंगळुरूतील सभेत शिक्कामोर्तब
2 व्हॉट्सअप ४० मिनिटांसाठी डाऊन होतं सांगत मोदींनी साधला ममता बॅनर्जींवर निशाणा; म्हणाले…
3 अशोका विद्यापीठाच्या संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला आहे, रघुराम राजन यांची टीका
Just Now!
X