सरकारने निरर्थक बडबड बंद करावी आणि जवानांच्या भल्यासाठी काहीतरी कृती करावी, असा टोला रॉबर्ट वडेरा यांनी भाजपला लगावला आहे. माजी सैनिक रामकिशन गढेवाल यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे मला अतीव दु:ख झाले आहे. त्यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला, त्यांच्या कुटुंबाला पोलिसांनी अटक का केली, या सगळ्याची खरोखरच चौकशी होण्याची गरज असल्याचे वडेरा यांनी म्हटले. दरम्यान, या घटनेवरून सध्या देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. गढेवाल कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याने मोठा गोंधळ झाला होता. राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यावर काँग्रेसचे सर्व नेते रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, आज हरियाणा येथील भिवानी या जन्मगावी रामकिशन गढेवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, काल व्ही.के. सिंह यांनी वादग्रस्त विधान करून राजकीय वादात आणखीनच तेल ओतले होते. या सैनिकाच्या मानसिक आरोग्याची तपासणी व्हायला पाहिजे, असे मत व्ही.के. सिंह यांनी व्यक्त केले. या सैनिकाने आत्महत्या केली. त्याचे कारण कुणालाही माहित नाही. मात्र, त्यासाठी वन रँक वन पेन्शनचे कारण जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या करताना त्यांच्या मनात काय सुरू होते, हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे सर्वप्रथम या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, असे व्ही.के. सिंह यांनी म्हटले होते.