विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी राम मंदिर निर्माणाचा मुद्दा केंद्र सरकारने लवकरात लवकर संसदेच्या सभागृहात प्रस्ताव आणून सोडवावा अशी मागणी केली आहे. भाजपाने राम भक्तांच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार आहे, तरीही राम मंदिराचे निर्माण होणार नसेल, तर केव्हा होणार ? आता रामभक्तांच्या धैर्याचा बांध तुटत चालला आहे. राम भक्तांनी एकत्र येऊन भाजपाला मतदान केलं, हे मतदान त्यांनी मुस्लिम महिलांना खुश करण्यासाठी नाही केलं, तर संसदेत कायदा बनवून राम मंदिराचे निर्माण करावे यासाठी केलं होतं, असं साध्वी प्राची म्हणाल्या. राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट असण्याबाबत साध्वी प्राची म्हणाल्या, मी न्यायालयाचा आदर करते. मात्र, आता राम भक्तांच्या धैर्याची परीक्षा पाहणे खूप झाले. आता, सरकार आपलेच आहे, त्यामुळे राम मंदिर निर्माणाला सुरुवात व्हायला हवी. एका रात्रीतून एससी/एसटी बील पास होतं, तीन तलाकच्या मुद्यावर निर्णय होऊ शकतो, तशाच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या मुद्यावरही निर्णय घ्यायला हवा.