दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणा हत्येप्रकरणी अटक झालेल्या सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपी सुशील कुमार याची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर तिहार जेल प्रशासनाने शुक्रवारी त्याला रोहिणी कोर्टात हजर केले. दरम्यान, कोर्टाने सुशील कुमार याच्या न्यायालयीन कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ केली आहे. याआधी रोहिणी कोर्टाने सुशील कुमारची तुरुंगात पौष्टिक आहार मिळवून देण्याची विनंती फेटाळून लावली होती.

सुशील कुमारने तिहार तुरुंगात स्वतासाठी सुरक्षा कक्ष आणि पौष्टिक आहाराची मागणी केली होती. सुशील कुमार त्याच्या याचिकेवरील निर्णय दिल्लीच्या रोहिणी कोर्टात राखून ठेवण्यात आला होता. सुनावणीदरम्यान आरोपी सुशीलच्या वकिलाने कोर्टात सांगितले होते की, आरोपी सुशील कुमारचा जीव तुरुंगात धोक्यात आहे, तो इतर आरोपींप्रमाणे तुरूंगात राहू शकत नाही.

सुशील कुमारच्या वकीलाने सुशीलला हाय सिक्यूरिटी सेल मध्ये ठेवण्याची मागणी केली होती. यावर तिहार जेलच्या वतीने न्यायालयात न्यायाधीशांनी सांगितले की, सुशील कुमारला सुरक्षेच्या कारणास्तव इतर कैद्यांपासून दुर ठेवले आहे. त्याला हाय सिक्योरिटी सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

सागर धनखड हत्या प्रकरण : साक्षीदारांचे रक्षण करण्यासाठी सरकारने पावले उचलावी!

सुशीलने केली होती पौष्टिक आहाराची मागणी

सुशील कुमारला पौष्टिक आहार पुरवण्याची केलेली मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळताना ही ‘अत्यावश्यक गरज’ नसल्याचे नमूद केले. २०१८ च्या दिल्ली कारागृह नियमानुसार तुरुंगात आरोपीच्या प्राथमिक गरजांकडे लक्ष दिले जाते. परंतु पौष्टिक आहार हा कोणत्याही प्रकारे अत्यावश्यक गरज नाही, असे मुख्य महानगर दंडाधिकारी सतवीर सिंग लांबा यांनी सांगितले होते.

आरोग्य आणि कामगिरी राखण्यासाठी पौष्टिक आहार अत्यावश्यक असल्याची मागणी करणारी याचिका सुशीलने रोहिणी न्यायालयात केली होती. सुशीलच्या प्रकृतीला  पौष्टिक आहाराची आवश्यकता नसल्याचे कारागृह प्रशासनाने आपल्या उत्तरात म्हटले.