गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी अडचणीत आलेले सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सोमवारी सुप्रीम कोर्टाने १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सुब्रतो रॉय यांना ७१० कोटी रुपये जमा करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी सुब्रतो रॉय यांच्या अडचणीत आले होते. गुंतवणूकदारांकडून उभारण्यात आलेल्या तब्बल २५,००० कोटींच्या रकमेची परतफेड सुब्रतो रॉय यांना करायची आहे. त्यांना सेबीकडे हे पैसे जमा करायचे आहेत. सोमवारी रॉय यांच्या जामिनासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सेबीने कोर्टात सांगितले की, सहारा यांना सुमारे २५ हजार कोटी द्यायचे आहेत. यातील १२ हजार कोटी रुपये त्यांनी जमा केले असून व्याजासह याची किंमत १४ हजार कोटी रुपये आहे. त्यांनी अजूनही ११, १६९ कोटी रुपये थकवले आहेत अशी माहिती सेबीने न्यायालयात दिली. सुब्रतो रॉय यांच्या वकिलांनी न्यायालयात भूमिका मांडली. सहारा यांना पैसे परत करायचे असून अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करु नये. कारण सुब्रतो रॉय यांच्यासाठी ते उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. अॅम्बी व्हॅलीत सहारा समूह ४०. ४० टक्के भागधारक आहे.

न्यायाधीश दीपक मिश्र आणि न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कपिल सिब्बल यांनी सहारा यांच्यावतीने युक्तिवाद केला. सहारा यांनी ७९० कोटी रुपये आधीपासून सेबीच्या खात्यात जमा केले आहे. उर्वरित पैसे जमा करण्यासाठी त्यांना १० दिवसांचा अवधी देण्याची विनंती त्यांनी कोर्टात केली. कोर्टाने ही विनंती मान्य करत त्यांना ५ जुलैपर्यंत जामीन मंजूर केला.