सहाराने डेव्हीड अँड सायमन रूबेन या अब्जाधीश बंधूंशी करार केला असून या बंधूंनी लंडनमधील ग्रोसव्हेनॉर व अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे असलेल्या प्लाझा व ड्रीम डाऊनटाऊन या हॉटेल्सबाबत ८५० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ५५०० कोटी रूपयांचा फेरअर्थसाहाय्य व्यवहार  केला आहे.सहारा समूहाने  असा करार झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.  ही तीनही हॉटेल्स दिवाळखोरीत होती त्यामुळे कर्जदार संस्थांकडून त्यांची विक्री होणे टळले आहे.
रूबेन बंधूंनी लंडन व अमेरिकेतील हॉटेल्सचा ताबा घेतला असल्याचे संडे टाइम्सने म्हटले आहे. डेव्हिड व सायमन रूबेन यांचे साम्राज्य डाटा सेंटर ते घोडय़ांच्या र्शयतींपर्यंत असून त्यांनी गेल्या आठवडय़ात बँक ऑफ चायनाकडून दोन मालमत्तांच्या बदल्यात कर्ज खरेदी केली होती.
ग्रोसव्हेनॉर हाऊस हॉटेल बँक ऑफ चायनाने विक्रीस काढले होते कारण त्याच्या व्यवहारात तांत्रिक उणिवा होत्या. सहारा समूह त्यांचे प्रमुख सुब्रता रॉय यांना तिहार तुरूंगातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी परदेशातील मालमत्ता विकण्याचे प्रयत्न सुरू होते. ग्रोसव्हेनॉर हॉटेल हे मार्चपासून बँक ऑफ चायनाच्या ताब्यात होते.
डेलॉइट व जेएलएस कन्सलटंट यांना या हॉटेलसाठी गिऱ्हाईक शोधण्यास सांगण्यात आले होते. सहारा समूहाने म्हटले आहे की, बँक ऑफ चायनाचे कर्ज परतफेड करण्याकरिता आम्ही फेरपरतफेडीचा व्यवहार करीत आहोत. ब्रिटन व अमेरिकेत आम्ही घेतलेले कर्ज योग्य अटीवर घेतले होते. सहाराच्या फेर अर्थपुरवठय़ाच्या योजनेत पुन्हा नवीन कर्जाची व्यवस्था आवश्यक आहे.
त्यातील पैसा बँक ऑफ चायनाला देऊन  ग्रोसव्हेनर हाऊस सोडवावे लागेल. उर्वरित पैसे रॉय व दोन अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी सेबीकडे अनामत ठेवावे लागतील.  तीन हॉटेल्स बँकांनी २०१०-१२ मध्ये १.५५ अब्ज डॉलर्स मूल्यांकन करून ताब्यात घेतली होती. सहारा समूह व सेबी यांच्यात कायदेशीर लढाई सुरू असून सहारा समूहाने गुंतवणूकदारांकडून २४ हजार कोटी जमवले होते व त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी ९५ टक्के रक्कम परत केली आहे.