भारतीय बनावटीच्या गस्तीनौकेचे गुरुवारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड येथे जलावतरण झाले. त्यांनी या गस्तीनौकेचे ‘सजग’ असे नामकरण केले. यावेळी श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव सुभाष चंद्रा, तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन उपस्थित होते.

भारतीय तटरक्षक दलासाठी पाच गस्तीनौका बांधणीचा प्रकल्प गोवा शिपयार्डने हाती घेतला आहे. त्यापैकी ‘सजग’ ही तिसरी गस्तीनौका आहे. पाच गस्तीनौकांच्या प्रकल्पाचे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या नौकांचा वापर प्रादेशिक सागरी सीमांमधील अनन्य आर्थिक क्षेत्राच्या रक्षणासाठी केला जाणार आहे.

अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि संगणकीय नियंत्रण कक्षाने युक्त अशी ही ‘सजग’ नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील सर्वात आधुनिक नौका आहे. २४०० टन वजनाच्या या नौकेत बचावकार्यासाठी आणि चाचेगिरीविरोधी शीघ्रकृती नाव, तोफा, इत्यादी शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत.

महासंचालक के. नटराजन यांनी गस्तीनौका करारात ठरल्यानुसार वेळेत बांधून पूर्ण केल्याबद्दल गोवा शिपयार्डच्या व्यावसायिक कौशल्याचे कौतुक केले. गस्तीनौकांचे आरेखन आणि बांधणी यासाठी शिपयार्ड आणि तटरक्षक दलामधील भागीदारीची त्यांनी प्रशंसा केली. तर ‘सजग’च्या बांधणीत ७० टक्के स्वदेशी घटकांचा वापर झाला असून शिपयार्डच्या परंपरेनुसार आम्ही ही नौका वेळेत पूर्ण केली आहे, असे गौरवोद्गार शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी.बी. नागपाल यांनी काढले.