भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने चेन्नईतील पूरग्रस्तांना दोन लाख रुपयांची मदत दिली आहे. सायनाचे वडिल हरवीर सिंग यांनी याबद्दची माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून चेन्नईत पूरपरिस्थिती आहे. हजारो घरं पाण्याखाली गेल्याने लाखो नागरिक बेघर झाले आहेत, तर यात अतिवृष्टीत बळी गेलेल्यांची संख्या २५०च्याही पुढे गेली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागामध्ये मदतकार्य पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने १२०० जवान तिथे पाठवले आहेत. त्यांच्या माध्यमातून चेन्नईच्या अंतर्गत भागात मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. चेन्नई विमानतळावरही अद्याप पाणी असल्यामुळे येत्या सहा डिसेंबरपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत २४०० लोकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली असून, १०० बोटींच्या साह्याने मदतकार्य सुरू आहे. अशावेळी सायनाने घेतलेल्या पुढाकारानंतर मदतीचा ओघ सुरू होण्याची आशा आहे.