१९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि अन्य दोन आरोपींनी आरोप रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. दिल्लीतील सुलतानपुरी भागात दंगलीदरम्यान सहा व्यक्तींची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने सज्जन कुमार आणि अन्य दोघांवर आरोप ठेवले होते. त्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्या. सुरेश कैट यांनी फेटाळून लावली. तसेच न्यायालयाने दंगलीतील पीडित शीला कौर यांनी सज्जन कुमार आणि अन्य चार आरोपींवर आणखी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात दाखल केलेली याचिकाही फेटाळली.
सहआरोपी असणाऱ्या वेदप्रकाश पिआल ऊर्फ वेदू प्रधान आणि बह्मानंद गुप्ता यांनीही उच्च न्यायालयात आरोपांविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालानंतर खालच्या न्यायालयात या पाच आरोपींविरोधात पुढील खटला चालविण्यात येईल. १९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत सहा व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सज्जन कुमार, ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात हत्येचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. जी.टी.नानावटी आयोगाने २००५ मध्ये सूचना केल्यानंतर पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जानेवारी २०१० मध्ये सीबीआयने या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कनिष्ठ न्यायालयाने १९८४ च्या दंगलीतील आणखी एका गुन्हय़ात सज्जन कुमार यांची नुकतीच मुक्तता केली होती.