पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये सध्या रेस्तराँ आणि हॉटेलमध्ये मांसाहार जेवणाची मागणी कमी झाली आहे. हॉटेल्समध्ये कुत्रे आणि मांजराचं मांस विकलं जात असल्याचा संशय असल्याने लोकांनी मांसाहार खाणंच बंद केलं आहे. प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की, हॉटेल अॅण्ड रेस्तराँ असोसिएशन ऑफ इस्टर्न इंडियाने आपल्या सदस्यांसाठी सूचना जारी करत फक्त नोंदणीकृत पुरवठादारांकडूनच मांस खरेदी करण्यास सांगितलं आहे.

कोलकातामधील राजाबार येथे एका बर्फाच्या फॅक्टरीवर करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान मृत जनावरांच्या मांसावर प्रक्रिया करत ते हॉटेल आणि रेस्तराँमध्ये विकलं जात असल्याचं समोर आलं होतं. यावेळी जवळपास २० टन मांस जप्त करण्यात आलं होतं, जे विकण्यासाठी तयार ठेवण्यात आलं होतं.

दक्षिण कोलकातात बिर्याणी विकणाऱ्या शेख शमीम यांनी आपल्या हॉटेलमधील विक्री ६० टक्क्यांनी कमी झाल्याचं सांगितलं आहे. ‘इतर दिवशी आम्हाला रोज २५ ते ३० किलो मांस लागतं, पण सध्या हे प्रमाण ८ किलोवर आलं आहे. यामुळे आमचं प्रचंड नुकसान होत आहे’, अशी माहिती त्यांनी दिली आहे. काही ठिकाणी मात्र काही फरक पडला नसून तितक्याच प्रमाणात मांसविक्री होत आहे.

दरम्यान याचा परिणाम म्हणून आठवड्याच्या अखेर मासे आणि भाज्यांची विक्री प्रचंड वाढली आहे. मृत जनावरांचं मांस विकलं जात असल्यापासून पोलीसही सज्ज झाले असून संशय असलेल्या ठिकाणी छापेमारी करत आहेत. कोलकाता विमानतळाजवळील होलसेल चिकनच्या दुकानात पोलिसांना मांस सापडलं असून मालक फरार झाला आहे. दरम्यान पोलिसांना याप्रकरणी १० जणांना अटक केली असून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.