पायपुसणी, चपलेवर अनुक्रमे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा प्रताप करणाऱ्या अॅमेझॉनच्या कृतीवर गुरुवारी राज्यसभेतील सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विरोधकांचा आक्रमक पवित्रा बघितल्यावर सरकारनेही या प्रकरणी संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यात आली असून, त्याचे योग्य परिणाम दिसले असल्याचे सभागृहात सांगितले. अॅमेझॉनसारख्या ऑनलाईन व्यापार करणाऱ्या साईट्सवर देशवासियांच्या भावना दुखावणाऱ्या गोष्टींची विक्री करण्यात येऊ नये. त्याचबरोबर राजमुद्रा, तिरंगा यांच्याशी कोणीही छेडछाड करू नये, यासाठी कडक नियम बनवण्यात आले पाहिजेत, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, अशा पद्धतीचे प्रकार थेटपणे नियंत्रित करता येऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा स्वरुपाचा कोणताही करार नाही. तरीही १९५० आणि १९७१ मधील कायद्यानुसार राष्ट्रीय चिन्हांचा कोणीही गैरवापर केल्यामुळे आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार कॅनडा आणि अमेरिका या दोन देशांमध्ये घडल्या. ज्या क्षणी हा प्रकार आमच्या लक्षात आल्या, त्याच क्षणी ओट्टावा आणि वॉशिंग्टनमधील दूतावासातील अधिकाऱ्यांनी संबंधित देशातील वरिष्ठांना हा प्रकार लक्षात आणून देण्यात आला. त्याचबरोबर हा विषय अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांच्यापर्यंतही पोहोचविण्यात आला. त्यानंतर लगेचच अॅमेझॉनने संबंधितांविरूद्ध कारवाई केली असून, हा प्रकार पुढील काळात घडणार नाही, अशी आशा सध्यातरी मी व्यक्त करतो. भविष्यात हे प्रकार थेटपणे रोखता येईल का, या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. सध्यातरी असा कोणताही आंतरराष्ट्रीय करार अस्तित्त्वात नाही, असे त्यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी संकेतस्थळावरुन काढल्यानंतर अॅमेझॉनने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र असणाऱ्या चपलेचे छायाचित्र कंपनीच्या कॅनडामधील संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी संकेतस्थळावरुन हटविण्यात आली होती.

खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवरून महात्मा गांधींचे चित्र काढण्यावरुन वाद सुरू असताना आता अॅमेझॉनने महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेल्या चपलांचे छायाचित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. ‘गांधी फ्लिप फ्लॉप्स’ या नावाने अॅमेझॉनने या चपला विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यांची किंमत १६.९९ अमेरिकी डॉलर इतकी ठेवण्यात आली होती.