“भारतातील मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची जास्त गरज आहे. त्यामुळेल अयोध्येत मिळणाऱ्या पाच  एकर जमिनीवर शाळा उभारावी”, असं मत ज्येष्ठ लेखक, निर्माते व अभिनेते सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मांडलं. गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं शनिवारी निकाल दिला. त्यामुळे “अयोध्येचा वाद आता संपला असून मुस्लीम समाजाने सर्वकाही विसरुन आता पुढे जायला हवं”, असंही ते म्हणाले.

अयोध्येतील वादगस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर जमीन देण्याचे आदेश सरकारला दिले. या निकालानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी अयोध्या निकालावर आपलं मत मांडलं.

आणखी वाचा : अयोध्या निकालानंतर तापसीने विचारला ‘हा’ प्रश्न

“मी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. खूप जुना विषय अखेर आता संपला आहे. या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. मुस्लिमांनी आता आपल्या मुलभूत समस्यांवर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. नमाज तर रेल्वे आणि विमानातही पठण केलं जाऊ शकतं. पण खरी गरज शाळा आणि रुग्णालयांची आहे. त्यामुळे अयोध्येत मिळणाऱ्या पाच एकर जमिनीवर शाळा किंवा कॉलेज बांधल्यास खूप चांगली गोष्ट होईल. मुस्लिमांना चांगलं शिक्षण मिळाल्यास आपल्या देशातील अनेक समस्या दूर होतील”, असं ते म्हणाले.

अयोध्येचा निर्णय आल्यानंतर देशात ज्या पद्धतीनं शांतात व सौहार्द राखला गेला ते कौतुकास्पद आहे, असंही म्हणाले.