अभिनेता सलमान खानने गुरूवारी हिट अँड रन खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. राज्य सरकारने सलमानच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या पार्श्वभूमीवर सलमानकडून ही याचिका दाखल करण्यात आली. राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी होताना आपले म्हणणे ऐकावे, तसेच ते ऐकल्याशिवाय याचिकेवर निर्णय देऊ नये, यासाठी हे ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आले आहे.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते. तसेच सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली. मागील शुक्रवारी राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.