काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरला असून न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे. सलमान खानला न्यायालयाने शिक्षा सुनावताच जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. बिष्णोई समाजाकडून ही घोषणाबाजी करण्यात आली. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती खत्री यांनी सलमान खानला दोषी ठरवले. तर उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू आणि सैफ अली खान या सर्वांविरोधात ठोस पुरावे नव्हते, त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने या सर्वांना दोषमुक्त केले. सलमानच्या शिक्षेबाबत दुपारपर्यंत युक्तिवाद झाला. सलमानच्या शिक्षेबाबतही आज (गुरुवारी) युक्तिवाद झाला. दुपारी न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल झाला होता.

काळवीट शिकार प्रकरण – घटनाक्रम
२ ऑक्टोबर १९९८ – वनविभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली.
एकूण ७ आरोपी –
सलमान, सैफ, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, दुष्यंत सिंग आणि दिनेश गावरे
९ नोव्हेंबर २००० – न्यायालयाने तक्रारीची दखल घेतली
19 फेब्रुवारी २००६ – आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले
२३ मार्च २०१३ – ट्रायल कोर्टाने सुधारणा आरोप निश्चित केले
२३ मे २०१३ – मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात
फिर्यादी पक्षाने २८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली
१३ जानेवारी २०१७ – साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण
२७ जानेवारी २०१७ – जबाब नोंदवण्यासाठी सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले
१३ सप्टेंबर २०१७ – फिर्यादी पक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात
२८ ऑक्टोबर २०१७ – बचावपक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात
२४ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टातील युक्तिवाद संपला.
२८ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टाने निर्णय राखून ठेवला
५ एप्रिल २०१८ – सलमान खान दोषी, पाच वर्षांची शिक्षा, इतरांची निर्दोष मुक्तता