चिंकारा शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याखाली सुरू असलेली सुनावणी न्यायालयाने १९ ऑगस्टपर्यंत तहकूब केली. या सुनावणीला सलमान खानने राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या पार्श्वभूमीवर सुनावणी तहकूब करण्यात आली.
यासंदर्भात सलमान खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण होऊन निकाल दिला जात नाही, तोपर्यंत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी घेण्यात येऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळेच कनिष्ठ न्यायालयातील सुनावणी १९ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली.
चिंकारा शिकार प्रकरणात सरकारी पक्षाने दिलेल्या पाच साक्षीदारांची फेरसाक्ष नोंदविण्यासाठी त्यांना परत बोलवावे, अशी मागणी सलमान खानच्या वकिलांनी केली आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर याविरोधात उच्च न्यायालयाकडे दाद मागण्यात आली. या साक्षीदारांमध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी रजतकुमार मिश्रा, तपास अधिकारी अशोक पटनी यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयात सध्या या प्रकरणी सुनावणी सुरू असून, २८ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.