केंद्रीय विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शीद अध्यक्ष असलेल्या झाकिर हुसैन ट्रस्टने बनावट कागदपत्रे सादर करून ७१ लाख रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांना खुद्द खुर्शीद यांनी रविवारी चोख प्रत्युत्तर दिले. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी, असे सांगतानाच मंत्रिपदावरून पायउतार होण्यास त्यांनी नकार दिला. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यापाठोपाठ खुर्शीद यांना अरविंद केजरीवाल यांनी लक्ष्य केल्याने केंद्रीय मंत्रिमंडळातील काँग्रेसचे सर्वच मंत्री खुर्शीद यांच्या बचावासाठी मैदानात उतरले.
झाकिर हुसैन ट्रस्टने ७१ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप इंडिया टुडे समूहाने ‘ऑपरेशन धृतराष्ट्र’ या स्टिंग ऑपरेशनद्वारे केले होते. पाठोपाठ इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर हल्लाबोल केला होता. या दोन्हींना खुर्शीद यांनी रविवारी सकाळी लंडनहून परतताच प्रत्युत्तर दिले. झाकिर हुसैन ट्रस्टच्या वतीने अपंगांसाठी आयोजित केलेल्या शिबिरांची छायाचित्रे व संबंधित दस्तावेज त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. केंद्रीय समाज कल्याण आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून आम्हाला ७१ लाख रुपये मिळाले, पण आम्ही ७७ लाख खर्च केले. अपंगांसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली नसल्याचे इंडिया टुडे समूहाचे आरोप चुकीचे आहेत. आम्ही १७ नव्हे तर ३४ शिबिरांचे आयोजन केले, असा खुर्शीद यांनी दावा केला. केंद्राकडून अनुदान मिळविताना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या बनावट असतील त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे खुर्शीद आणि त्यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांनी स्पष्ट केले. आपल्या बचावाखातर त्यांनी लेखा परीक्षणाचा अहवाल आणि पावत्याही दाखवल्या तसेच लाभार्थी अपंगांनाही पत्रकारांपुढे सादर केले. या पत्रकार परिषदेदरम्यान खुर्शीद यांनी केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांचीही उत्तरे दिली.
दुसरीकडे, केंद्र सरकारमधील काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी खुर्शीद यांची पाठराखण करत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय प्रसारण मंत्री अंबिका सोनी या सर्वानी खुर्शीद यांच्यावरील आरोप फेटाळतानाच केजरीवाल हे स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने करत असल्याची टीका केली.     
१०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला.
झाकिर हुसैन ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने याप्रकरणी कोणत्याही चौकशीस आपण तयार आहोत. पण इंडिया टुडेचे अध्यक्ष अरुण पुरी यांनीही जबाबदारी स्वीकारून या प्रकरणी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवावी, असे आव्हान खुर्शीद यांनी दिले. त्याचवेळी  इंडिया टुडेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून आपल्यापुढे पर्यायच नव्हता, असे ते म्हणाले. खुर्शीद यांच्या वतीने इंडिया टुडेविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला भरण्यात आला आहे. आपण येणाऱ्या दिवसात समयोचित पत्रकार परिषदा बोलावून या प्रकरणी टप्प्या-टप्प्याने सर्व आरोपांचे उत्तर देऊ, असे खुर्शीद म्हणाले. सुमारे दोन तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत इंडिया टुडे समूहाच्या पत्रकारांशी खुर्शीद यांच्यात खटके उडाले. झाकिर हुसैन ट्रस्टमधील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून आपण केंद्रीय विधी व न्यायमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, मात्र ‘ऑपरेशन धृतराष्ट्र’द्वारे स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या ‘इंडिया टुडे’ समूहाचे सर्वेसर्वा अरुण पुरी यांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि आपल्यासोबत या प्रकरणी चौकशीला सामोरे जावे, असे आव्हानही खुर्शीद यांनी तावातावाने दिले.