News Flash

गळा घोटणाऱ्या हिंसाचाराविरोधातील कृतीला पाठिंबा -सलमान रश्दी

रश्दी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हे मोदींचे चाटुगिरी करणारे लोक आहेत.

बुकर विजेते लेखक सलमान रश्दी यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या कारणास्तव पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांना निर्भर्त्सना करणारे द्वेषमूलक संदेश आले आहेत.

‘कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही’

बुकर विजेते लेखक सलमान रश्दी यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या कारणास्तव पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांना निर्भर्त्सना करणारे द्वेषमूलक संदेश आले आहेत. त्यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करण्याच्या लेखिका नयनतारा सहगल यांच्या निर्णयाचे ट्विटरवर स्वागत केले होते. सहगल यांनी नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या निषेधार्थ पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर रश्दी यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या कृतीला पाठिंबा दिला होता. रश्दी यांनी मोदी समर्थकांच्या टीकेचा समाचार घेताना सांगितले की, गळा घोटणाऱ्या प्रवृत्तींच्या हिंसाचाराविरोधात लेखकांनी केलेल्या कृतीला आपण पाठिंबा दिलेला आहे. कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही.

रश्दी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हे मोदींचे चाटुगिरी करणारे लोक आहेत. आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थन केलेले नाही. केवळ भाषण स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्यांना विरोध केला आहे. स्वातंत्र्य हाच आपला पक्ष आहे. हे मोदींची तळी उचलणाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

ओआरएफचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तकाच्या मुंबईतील प्रकाशन समारंभाला त्यांचा विरोध होता त्यानंतर ट्विट संदेशात रश्दी यांनी म्हटले आहे की, भारतीय जीवनात सध्या गळा घोटणाऱ्या प्रवृत्तींचा हिंसाचार बोकाळला आहे, ही नव्याने लक्षात आलेली गोष्ट आहे.

पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या कृतीचा समाचार घेताना लेखक चेतन भगत यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, आधी पुरस्कार स्वीकारायचा व नंतर परत करायचा हा त्या पुरस्काराचा व निवड करणाऱ्यांचा अपमान आहे. हे केवळ राजकारण आहे. जर कुणाला सत्तेवरील सरकार आवडत नसेल तर ते सरकारी महाविद्यालयांनी दिलेल्या पदव्या, पासपोर्ट परत करतील का?

भगत यांच्यावर समाजमाध्यमात टीकेची झोड उठली असून त्यात त्यांनी विनोदाने म्हटले आहे की, आपणही साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्यास तयार आहोत पण अजून तो मिळालेला नाही. दादरी घटनेचा जे राजकारणी निषेध करीत नाहीत ते मतपेढीचे राजकारण करीत आहेत, पण जे निषेधार्थ पुरस्कार परत करीत आहे तेही तेच करीत आहेत किंबहुना त्यापेक्षा कमी नाही.

दरम्यान साहित्य अकादमीने या विषयावर चर्चा करण्यासाठी २३ ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे.

 

पद्मश्री परत

दरम्यान चंडीगडच्या वृत्तानुसार पंजाबी लेखिका दलिप कौर तिवाना यांनी वाढत्या जातीय तणावामुळे पद्मश्री किताब परत केला आहे.

गौतम बुद्ध व गुरू नानक देव यांच्या भूमीत १९८४ मध्ये शिखांवर अत्याचार करण्यात आले. नंतर मुस्लिमांवरही अत्याचार झाले. जातीयवादाने देश व समाजाची पातळी घसरली आहे. सत्य व न्यायाची भाषा करणाऱ्यांना ठार केले जाते ही शरमेची बाब आहे. त्याच्या निषेधार्थ आपण पद्मश्री किताब परत करीत आहोत, असे त्यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तिवाना यांना २००४ मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित केले होते व त्याआधी त्यांना १९७१ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार एहो हमारा जीवन (धिस अवर लाइफ) या पुस्तकासाठी देण्यात आला होता. पंजाबमधून तीन दिवसात आठजणांनी पुरस्कार परत केले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2015 3:13 am

Web Title: salman rushdie said i will not support to any party
टॅग : Salman Rushdie
Next Stories
1 कुशवाह यांच्याविरुद्ध गुन्हा
2 मंत्र्याच्या बनावट पदवीप्रकरणी गुजरात सरकारला न्यायालयाची नोटिस
3 वीरप्पन याच्या पत्नीला ‘अन्नदान’ कार्यक्रमाची मंजुरी
Just Now!
X