काळवीट हत्या प्रकरणाशी संबंधित विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच साक्षीदारांची पुन्हा साक्षीसाठी बोलावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी सलमान खानची फेरविचार याचिका येथील एका न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.
सलमानचे वकील एच. एम. सारस्वत यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. याचिका फेटाळल्याची कारणे न्यायालयाच्या आदेशाची प्रत आल्यानंतरच स्पष्ट होतील. त्या आधारे आम्ही उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
जोधपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी याचिकेवरील सुनावणी गेल्या आठवडय़ात ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्याने सलमानने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
याचिकेत नमूद करण्यात आलेले पाच साक्षीदार अभियोजन पक्षाचे साक्षीदार असून त्यांची याआधीच तपासणी झालेली आहे. मात्र  २००६ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने अभियोजन पक्षाला चार साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्याची परवानगी दिल्यानंतर बचाव पक्षाने पहिल्या पाच साक्षीदारांचीही फेरसाक्ष घेण्याची मागणी केली होती.
काळवीट हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्याची मुदत संपल्याचे तपासावेळी स्पष्ट झाल्यामुळे सलमानवर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला होता.