पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅम पित्रोदा यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसच्या वतीने त्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे अशी टीका केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला असून पित्रोदा यांच्या या विधानांमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘सर्वात विश्वासू सल्लागार आणि काँग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सुरक्षा दलांचा अपमान करत काँग्रेसच्या वतीने पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे’.

‘काँग्रेसच्या शाही घराणेशाहीच्या निष्ठावंतांनी जे देशाला आधीपासून माहिती आहे की, काँग्रेसला कधीच दहशतवादाला उत्तर द्यायचं नव्हतं ते पुन्हा सांगितलं आहे. हा नवा भारत आहे. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल’, असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

‘विरोधक वारंवार आपल्या सुरक्षा दलांचा अपमान करत आहेत. मी माझ्या सहकारी भारतीयांना आवाहन करतो की त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारावा. त्यांना सांगा 130 कोटी भारतीय विसरले नाहीत आणि विसरणारही नाहीत. भारतीय आपल्या सुरक्षा दलांसोबत ठाम उभे आहेत’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर केलेले एअर स्टाइक या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पित्रोदा म्हणाले, भारताच्या या हवाई हल्ल्याबाबत मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले. त्यानुसार, भारताने खरंच असा हल्ला केला का? आपण खरंच ३०० दहशतवादी मारले? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.

काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असे मतही पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. भारतावर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. मुंबईतही असाच हल्ला झाला होता, तेव्हा देखील आपण विमाने पाठवू शकलो असतो. पण मला ही भूमिका पटत नाही, असे पित्रोदा यांनी सांगितले.