काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर निश्चितपणे होईल, तसेच राहुल-प्रियंका ही भाऊ-बहीण जोडी काँग्रेससाठी बदलाची शिल्पकार ठरेल, असा विश्वास इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केला आहे. राजीव गांधी यांच्या काळात भारतात दूरसंचार क्रांती आणण्याचे श्रेय पित्रोदा यांना जाते. त्यांनी ज्ञान आयोग व राष्ट्रीय नवप्रवर्तन मंडळाची स्थापना यूपीए सरकारच्या काळात केली होती.

पित्रोदा म्हणाले, की राहुल व प्रियंका यांच्या जोडीला सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा यांची साथ आहे, त्यामुळे ही तरुणांची फळी केवळ इतिहास व धर्मात न अडकून पडता चांगले काम करील. शिकागो येथून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की भारताला समूहात काम करणाऱ्यांची गरज आहे. एकमेकांच्या सहकार्याने देश पुढे जात असतो. सध्या केंद्रात जे सरकार आहे ते सहकार्याच्या तत्त्वावर चालणारे नाही. खोटेपणापेक्षा सत्यावर विश्वास असणाऱ्यांची देशाला गरज आहे.

‘घराणेशाही सगळय़ाच क्षेत्रात’

घराणेशाहीच्या भाजपच्या आरोपाबाबत  पित्रोदा  म्हणाले, की घराणेशाही सगळय़ाच क्षेत्रात आहे. केवळ त्या जोरावर सगळे भागत नाही. कामगिरी करून दाखवावीच लागते. अन्यथा घराणेशाहीचा काही उपयोग होत नाही. काँग्रेस अध्यक्ष  झाल्यानंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली असून, त्यांना आता अधिकार मिळाल्याने मोकळेपणाने काम करता येत आहे.