उत्तर प्रदेशात राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंमलबजावणी केली तर सर्वात आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्य सोडावं लागेल असा टोला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लगावला आहे. अखिलेश यादव यांनी एनआरसी म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे.

“जर उत्तर प्रदेशात एनआरसीची अंमलबजावणी केली तर आदित्यनाथ यांना राज्य सोडावं लागेल. ते मुळचे उत्तराखंडचे रहिवासी आहेत,” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. “एनआरसी म्हणजे लोकांमध्ये राजकारणाच्या माध्यमातून भीती निर्माण करण्याचा प्रकार आहे. आधी फोडा आणि राज्य करा होतं, आता भीतीचं राजकारण होत आहे. आपण विभाजक शक्तींना हाकलून लावलं आहे. आता जे लोक भीती निर्माण करत आहे त्यांना सरकारमधून बाहेर काढायची वेळ आली असल्याचं लोकांना समजावून सांगायचं आहे,” असंही अखिलेश यादव यांनी सांगितलं आहे.

१६ सप्टेंबर रोजी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी राज्यात एनआरसीची अंमलबजावणी करण्यासाठी आपलं सरकार प्रतिकूल नसल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी आसाममध्ये एनआरसीची अंमलबजावणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं होतं. ३१ ऑगस्ट रोजी आसाममध्ये एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण तीन कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला, तर तब्बल १९.६ लाख लोकांना या यादीत स्थान मिळालेले नाही.