समाजवादी पक्षात निर्माण झालेल्या ‘यादवी’च्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्पष्टीकरण दिले. सध्याचा सुरू असलेला संघर्ष हा सरकारमध्ये आहे, कुटुंबात नाही, असे अखिलेश यांनी सांगितले. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील भ्रष्ट नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मुलायमसिंह यादव यांच्याशी निष्ठावंत असणाऱ्या नेत्यांच्या मनात अखिलेश यांच्याविरूद्ध नाराजी निर्माण झाली आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या सूचनेनुसार मंगळवारी शिवपाल यादव यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी तडकाफडकी शिवपाल यादव यांच्याकडील मंत्रिपदाचा पदभार काढून घेतला आणि यादव कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात वडील-काका विरुद्ध मुलगा असे दोन तट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उत्तर प्रदेशात सत्तेवरून ‘यादवी’; सत्ताधारी यादव कुटुंबात कलह
या पार्श्वभूमीवर आज अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या कुटुंबात वाद असल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढू शकता? हा संघर्ष सरकारमध्ये आहे, कुटुंबात नव्हे. परिवाराबाहेरील लोकांनी हस्तक्षेप केला तर सरकारचा कारभार कसा चालणार, असा सवाल यावेळी अखिलेश यांनी उपस्थित केला. काही निर्णय नेताजी (मुलायमसिंह) यांच्याशी चर्चा करून घेणे मला मान्य आहे. मात्र, काही निर्णय मी स्वत: घेतो, असे सूचक विधान यावेळी अखिलेश यांनी केले. तत्पूर्वी मुलायमसिंह यांनी अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांना दिल्लीत बोलावले होते. मात्र, अखिलेश यादव यांनी दिल्लीत जाण्यास नकार दिला आहे. दरम्यान, शिवपाल यादव यांनी मुलायमसिंह जे सांगतील ते करेन, अशी भूमिका घेतली आहे. शिवपाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अखिलेश यांच्याबद्दल अवाक्षरही न काढता मंत्रिपदावर राहायचे की नाही याचा निर्णय मुलायम यांच्या भेटीनंतरच घेणार असल्याचे सांगितले. सध्या शिवपाल यादव चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत.