लोकसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यामध्ये मुलायमसिंह यादव यांनी आपल्या समाजवादी पक्षाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. समाजवादी पार्टीला आमचेच लोक संपवतायत असे मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे.


मुलायमसिंह यादव गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच लोकसभेसाठी सपाने बसपासोबत केलेल्या युतीवरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या युतीसाठी ३८-३८ जागा कोणत्या आधारावर वाटल्या, असा सवाल त्यांनी विचारला तसेच बसपापेक्षा सपाची लायकी जास्त आहे. त्यामुळे सपाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच जर पक्षाने एकट्याने निवडणूक लढवली असती तर चांगली कामगिरी केली असती, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

पक्षाला कोण संपवत आहे? आपल्याच पक्षाचे लोक हे करीत आहेत. यापूर्वी समाजवादी पार्टी एक मजबूत पार्टी होती. पक्षाने एकट्यानेच निवडणुका लढवत राज्यात ३ वेळा सत्ता आणली होती. तिन्ही वेळी मीच मुख्यमंत्री होतो, एकदा केंद्रीय संरक्षण मंत्रीही झालो. त्यावेळी पक्ष खरोखर मजबूत स्थितीत होता. आम्ही यावरुन राजकारण करीत नाही आहोत, मात्र खरं तेच सांगतोय अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमावर जाहीररित्या नाराजी व्यक्त केली.

आता पक्षात उमेदवारांना कमजोर केले जात आहे. पक्षात महिलांची संख्या कमी होत आहे ही चिंतेची बाब असल्याचे मुलायमसिंह यांनी म्हटले आहे. मात्र, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना आता सर्वकाही सोडून निवडणुकीच्या प्रचार कामात झोकून द्या आणि जिंकल्यानंतरच दम खा, असे ते म्हणाले. सपा-बसपाच्या युतीची अधिकृत घोषणा १२ जानेवारी रोजी झाली होती. यामध्ये उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी दोन्ही पक्ष प्रत्येकी ३८ जागा लढवेल असे ठरवण्यात आले.